
मुंबई JPN NEWS - गोरेगाव पूर्वेतील नागरिक निवारा परिसरात दोन वर्षांच्या चिमुरडीला इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून फेकल्याची धक्कादायक घटना १४ ऑक्टोबरच्या रात्री घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात शेजारी राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चिमुरडीला धक्का दिल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईला ताब्यात घेतले असून, घटनेच्या सर्व पैलूंचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास गोरेगाव पूर्वेतील नागरिक निवारा परिसरातील शिवशाही प्रकल्पाच्या इमारत क्रमांक १ मध्ये ही घटना घडली. अबीरा शेख असे दोन वर्षांच्या चिमुरडीचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. शेजारी राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीने तिला इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली ढकलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणात इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचा प्रयत्न झाल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने हे फुटेज पुन्हा मिळवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या फुटेजसह उपलब्ध पुरावे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकतात.
दिंडोशी पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, घटनेच्या वेळी नेमके काय घडले, यामागील कारण काय होते आणि सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचा प्रयत्न कोणी केला, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.


No comments:
Post a Comment