Mumbai भांडुपमध्ये लग्नसमारंभातील खरवस खाल्ल्याने ३२ जणांना त्रास; २७ रुग्णालयात दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 November 2026

Mumbai भांडुपमध्ये लग्नसमारंभातील खरवस खाल्ल्याने ३२ जणांना त्रास; २७ रुग्णालयात दाखल


मुंबई JPN NEWS - भांडुप पूर्व येथील एका लग्नसमारंभात खरवस हे दुग्धजन्य गोड पदार्थ खाल्ल्यानंतर अनेकांना अचानक त्रास झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एकूण ३२ जणांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती असून, त्यापैकी २७ जणांना मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य पाच जण राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी आले होते. मात्र, त्यांनी वैद्यकीय सल्ल्याविरुद्ध रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला (DAMA). एम. टी. अग्रवाल रुग्णालयात दाखल असलेल्या २७ रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

भांडुप पूर्व येथील महाबोधी रत्नविहार हॉलमध्ये लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात उपस्थितांनी जेवणासोबत खरवस या दुधापासून तयार होणाऱ्या गोड पदार्थाचे सेवन केले. त्यानंतर काही जणांना उलट्या, मळमळ, पोटदुखी किंवा अन्य त्रास जाणवू लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे लग्नसमारंभात उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली.

पहाटे दोनच्या सुमारास घटना उघडकीस - 
सोमवारी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. त्रास जाणवणाऱ्या नागरिकांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये नेण्यात आले. त्यापैकी २७ जणांना एम. टी. अग्रवाल रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले. तर राजावाडी रुग्णालयात गेलेल्या पाच जणांनी पुढील उपचार न घेता वैद्यकीय सल्ल्याविरुद्ध डिस्चार्ज घेतला.

खरवसमुळे अन्नविषबाधेचा संशय - 
खरवस खाल्ल्यानंतर नागरिकांना त्रास सुरू झाल्याने संशयित अन्नविषबाधेची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अन्नपदार्थाचे नमुने तपासल्यानंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. संबंधित अन्नपदार्थाची गुणवत्ता, तो तयार करण्याची पद्धत आणि साठवणूक याबाबत तपासणी होणे आवश्यक आहे.

लग्नसमारंभातील अन्नपदार्थामुळे अनेकांना एकाच वेळी त्रास झाल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेची अधिकृत चौकशी आणि अन्ननमुना तपासणीचा अहवाल समोर आल्यानंतरच अन्नविषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होईल.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS