
मुंबई JPN NEWS - मुंबईकरांसाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आनंदाची बातमी आहे. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेत आशियाई सिंह आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी जुनागढ येथील साकरबाग प्राणिसंग्रहालय आणि मुंबई प्राणिसंग्रहालय यांच्यात सामंजस्य करार करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे निर्देश गुजरात प्रशासनाला दिले आहेत.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बुधवारी (४ नोव्हेंबर) गांधीनगर येथील मुख्यमंत्री निवासस्थानी भूपेंद्र पटेल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर गुजरात प्रशासनाकडून मुंबई महापालिकेला मंजुरीचे लेखी पत्र आणि सामंजस्य कराराचा मसुदा लवकरच पाठवण्यात येणार असल्याची माहिती महापौर कार्यालयाने दिली आहे.
दोन नर आणि दोन मादी सिंह मुंबईत येणार -
गुजरातमधील जुनागढ येथील प्रसिद्ध साकरबाग प्राणिसंग्रहालयाकडून मुंबईच्या राणीबागेसाठी आशियाई सिंहांच्या दोन जोड्या म्हणजेच दोन नर आणि दोन मादी देण्याचा प्रस्ताव आहे. त्याबदल्यात मुंबई प्राणिसंग्रहालयाकडून टफ्टेड कॅपुचिन माकडांच्या (Tufted Capuchin Monkeys) तीन जोड्या साकरबाग प्राणिसंग्रहालयाला देण्यात येणार आहेत. दोन्ही प्राणिसंग्रहालयांनी या प्राणी देवाणघेवाणीला यापूर्वीच संमती दर्शवली आहे.
सिंहांसाठी अत्याधुनिक निवासस्थान सज्ज -
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या (CZA) अंतिम मान्यताप्राप्त मास्टर लेआऊट प्लॅननुसार मुंबई प्राणिसंग्रहालयात आशियाई सिंहांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक निवासस्थान (Exhibit) तयार करण्यात आले आहे. त्यामुळे आवश्यक प्रशासकीय आणि नियामक मंजुरीनंतर सिंहांना मुंबईत आणण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकणार आहे.
गुजरातच्या वन राज्यमंत्र्यांचीही भेट -
महापौर रितू तावडे यांनी गुजरातचे वन राज्यमंत्री प्रवीणकुमार माळी यांचीही गांधीनगर येथे भेट घेतली. मुंबई प्राणिसंग्रहालयाला आशियाई सिंह लवकर उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली. यावेळी राज्यमंत्री माळी यांनी महापौरांचे निवेदन स्वीकारून त्यावर तत्काळ शेरा लिहिला आणि वन विभागाच्या प्रधान सचिवांना पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले.
या भेटीवेळी ध्रंगध्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशभाई वरमोरा, गुजरात मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव संजीव कुमार, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जक्षय शाह, मुंबई प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महापौरांच्या या प्रयत्नांमुळे मुंबई आणि गुजरात यांच्यातील वन्यजीव संवर्धन सहकार्याला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. सामंजस्य करार आणि आवश्यक मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राणीबागेत आशियाई सिंहांचे आगमन होण्याचा मार्ग अधिक स्पष्ट होणार आहे.


No comments:
Post a Comment