मुंबईकरांना दिवाळी भेट! BESTच्या ताफ्यात ४८ नवीन इलेक्ट्रिक एसी बसगाड्या दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 November 2026

मुंबईकरांना दिवाळी भेट! BESTच्या ताफ्यात ४८ नवीन इलेक्ट्रिक एसी बसगाड्या दाखल


मुंबई JPN NEWS - मुंबईकरांचा बसप्रवास अधिक आरामदायी, जलद आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने दिवाळीच्या मुहूर्तावर प्रवाशांना विशेष भेट दिली आहे. बेस्टच्या ताफ्यात १२ मीटर लांबीच्या ४८ नवीन एकमजली वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. या बसगाड्यांचे लोकार्पण मंगळवारी मागाठणे आगार येथे बेस्ट समितीच्या अध्यक्ष तृष्णा विश्वासराव आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या नवीन बसगाड्यांमुळे गर्दीच्या मार्गांवरील प्रवासी वाहतूक क्षमता वाढण्यास मदत होणार असून, बस थांब्यांवरील प्रतीक्षा वेळ कमी होण्याची अपेक्षा आहे. या बसगाड्या 'ईव्ही ट्रान्स महाराष्ट्र प्रा. लि.' या कंपनीमार्फत भाडेतत्त्वावर बेस्टला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

४४ बस पाच मार्गांवर धावणार - 
नवीन बसगाड्यांपैकी ४४ बसगाड्या मागाठणे आगारातून पाच विविध बसमार्गांवर प्रवर्तित करण्यात येणार आहेत. कांदिवली बसस्थानक (पूर्व), संघर्ष नगर (चांदिवली), समतानगर बसस्थानक (कांदिवली पूर्व) आणि मागाठणे आगार येथून या बसगाड्या सोडण्यात येतील. या मार्गांद्वारे बोरीवली स्थानक (पूर्व), ठाणे स्थानक (पूर्व) आणि मीरा रोड स्थानक (पूर्व) या रेल्वेस्थानकांशी जोडणी होणार आहे. त्यामुळे रेल्वे आणि बस प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.

एका बसमध्ये ४१ प्रवाशांसाठी आसनव्यवस्था - 
नवीन इलेक्ट्रिक बसगाड्यांमध्ये ४१ प्रवाशांसाठी प्रशस्त आसनव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांना सहज चढता-उतरता यावे यासाठी दरवाजे अधिक रुंद करण्यात आले आहेत. तसेच बॅटरीचे वजन १६ टक्क्यांनी कमी करण्यात आले असून, छताऐवजी बसच्या तळभागात बॅटरीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बसमधील जागेचा अधिक चांगला वापर करता येणार आहे.

या बसगाड्यांमध्ये सीसीएस-२ चार्जिंग प्रणालीचा वापर करण्यात आला असून, बॅटरी ५८ टक्के अधिक वेगाने चार्ज होण्याची सुविधा असल्याचे बेस्ट प्रशासनाने सांगितले आहे. गर्दीच्या मार्गांवर मोठ्या क्षमतेच्या बस उपलब्ध झाल्याने प्रवाशांची वाहतूक अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक सुविधा - 
या बसगाड्यांमध्ये एबीएस ब्रेकिंग प्रणाली, हायड्रॉलिक पॉवर-असिस्टेड स्टेअरिंग, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहन मागोवा प्रणाली (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम), आपत्कालीन पॅनिक बटण अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच आगार स्तरावरील व्हिडिओ विश्लेषण सुविधा कमांड कंट्रोल केंद्राशी जोडण्यात आली आहे. त्यामुळे बसगाड्यांच्या हालचालींवर आणि सुरक्षेवर नियमित देखरेख ठेवता येणार आहे.

बेस्टच्या ताफ्यात आणखी बसगाड्या दाखल होणार - 
'ईव्ही ट्रान्स महाराष्ट्र प्रा. लि.' या कंपनीला १२ मीटर लांबीच्या एकूण २,४०० एकमजली वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी खरेदी आदेश देण्यात आला आहे. यापैकी छतावर बॅटरी बसविण्यात आलेल्या ५० बसगाड्यांचा पुरवठा यापूर्वीच झाला आहे. नव्याने दाखल झालेल्या बसगाड्यांसह या कंपनीच्या एकूण ९८ बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट झाल्या आहेत.

याशिवाय केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाच्या पीएम ई-ड्राइव्ह (PM E-DRIVE) योजनेअंतर्गत १,५०० मिडी वातानुकूलित बसगाड्यांसाठीही खरेदी आदेश देण्यात आला आहे. या दोन्ही खरेदी आदेशांअंतर्गत आणखी बसगाड्या टप्प्याटप्प्याने बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

प्रदूषण कमी करण्याच्या दिशेने पाऊल - 
या १०० टक्के इलेक्ट्रिक बसगाड्यांमधून धूररहित प्रवासाची सुविधा मिळणार असून, शहरातील वायू आणि ध्वनीप्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नांना हातभार लागणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, जलद चार्जिंग, सुरक्षितता आणि अधिक प्रवासी क्षमता यामुळे मुंबईकरांचा सार्वजनिक बसप्रवास अधिक सोयीस्कर करण्याच्या दिशेने बेस्टने आणखी एक पाऊल टाकले आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS