
मुंबई JPN NEWS - बोरिवली पूर्व येथील बेस्ट बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिकेने बुधवारी (४ नोव्हेंबर २०२६) यशस्वीरीत्या पूर्ण केली. स्वामी विवेकानंद मार्गावरील सुमारे ३ हजार ४०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावरील एकूण २७ व्यावसायिक गाळे निष्कासित करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात महापालिका प्रशासनावर कठोर भूमिका घेतल्यानंतर ही कारवाई पूर्ण झाल्याने या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
बोरिवली पूर्व येथील अंमल भूखंड क्रमांक ७ बी, नगर भूमापन क्रमांक १५, नगररचना योजना क्रमांक दोननुसार हा भूखंड बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) बस स्थानकासाठी आरक्षित आहे. या जागेवरील अतिक्रमणांमुळे बस स्थानकाचा प्रकल्प रखडला होता. अखेर महापालिकेच्या आर-मध्य विभागाने बुधवारी सकाळपासून अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबवून सर्व २७ व्यावसायिक गाळे हटविले.
७० कर्मचारी, दोन जेसीबी आणि चार डंपर तैनात -
या मोहिमेत आर-मध्य विभागाचे अभियंते, ७० कामगार आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. दोन जेसीबी आणि चार डंपरच्या सहाय्याने अतिक्रमित व्यावसायिक गाळे निष्कासित करण्यात आले. संपूर्ण कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून सर्व २७ व्यावसायिक गाळे हटविण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने आयुक्तांच्या वेतनाबाबत दिले होते निर्देश -
या भूखंडावरील अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू होते. यापूर्वी न्यायालयाने संबंधित जागेचा ताबा घेऊन अतिक्रमणे कायद्यानुसार हटविण्याचे आणि बेस्ट बस स्थानकाचा प्रकल्प मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या आदेशांची वेळेत अंमलबजावणी न झाल्याने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
अतिक्रमणे हटविण्यासाठी आणखी ३० दिवसांची मुदत मागणारी महापालिकेची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी स्पष्टीकरण मागविले. त्यांचे आणि संबंधित वैयक्तिक कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय महापालिकेला पाच लाख रुपयांचा खर्च भरण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
आता बेस्ट बस स्थानकाच्या विकासकामांकडे लक्ष -
सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर निर्देशांनंतर महापालिकेने अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम पूर्ण केली आहे. त्यामुळे बोरिवली पूर्वेतील बेस्ट बस स्थानकासाठी आरक्षित असलेला भूखंड मोकळा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आता या जागेचा ताबा, प्रस्तावित बस स्थानकाची उभारणी आणि पुढील प्रशासकीय प्रक्रिया कधी पूर्ण होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


No comments:
Post a Comment