
मुंबई JPN NEWS - अभिनेत्री दिया मिर्झाच्या पर्यावरणपूरक दिवाळीविषयक जनजागृती करणाऱ्या व्हिडिओवरून निर्माण झालेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. मुंबई महापालिकेने हटवलेला दिया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच, पर्यावरण आणि ध्वनीप्रदूषणासारख्या सार्वजनिक हिताच्या विषयाला वेगळे वळण देत राजकीय रंग देण्याबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भातील सुनावणी झाली. काही राजकीय व्यक्तींनी अभिनेत्रीच्या जनजागृती मोहिमेबाबत केलेल्या विधानांमुळे आपण व्यथित असल्याचे न्यायालयाने नमूद केले. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि पर्यावरणाचा प्रश्न हा कोणत्याही एका धर्मापुरता मर्यादित नसून प्रत्येक नागरिकाशी संबंधित आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
महापालिकेने जनजागृतीसाठी कलाकारांची केलेली निवड योग्य होती, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. सार्वजनिक हिताच्या मोहिमेला अनावश्यक वळण देणे दुर्दैवी असल्याचे सांगत, हटवलेली चित्रफीत पुन्हा अपलोड करणे योग्य ठरेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मुंबई शहराची एकजूट आणि सामाजिक सलोखा काही बेजबाबदार विधानांमुळे बाधित होता कामा नये, असेही न्यायालयाने बजावले.
भाजपच्या आक्षेपानंतर चित्रफीत हटवली -
मुंबई महापालिकेच्या दिवाळी जनजागृती मोहिमेत दिया मिर्झासह अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांचाही सहभाग होता. सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि मोकळ्या जागांवर फटाके न फोडण्याचे तसेच ध्वनी व वायुप्रदूषण टाळण्याचे आवाहन या चित्रफितींतून करण्यात आले होते.
मात्र, भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी दिया मिर्झाच्या सहभागावर आक्षेप घेतल्यानंतर महापालिका प्रशासनाने तिची चित्रफीत समाजमाध्यमांवरून हटवली. त्यानंतर या निर्णयावरून राजकीय वाद निर्माण झाला. महापौर रितू तावडे यांनीही दिया मिर्झाच्या भूमिकेवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने महापालिकेच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली.


No comments:
Post a Comment