दिवाळीप्रमाणे बकरी ईदसाठीही सेलिब्रिटींकडून जनजागृती करा; किरीट सोमय्यांची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 November 2026

दिवाळीप्रमाणे बकरी ईदसाठीही सेलिब्रिटींकडून जनजागृती करा; किरीट सोमय्यांची मागणी


मुंबई JPN NEWS - दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत अभिनेत्री दिया मिर्झाच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या मुंबई महापालिकेने आता बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरही अशाच प्रकारचे जनजागृती अभियान राबवावे, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. बकरी ईद कशी साजरी करावी, याबाबत मुस्लिम समाजातील अभिनेते आणि अभिनेत्री यांनी नागरिकांना आवाहन करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. या मागणीमुळे मुंबई महापालिकेतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

बकरी ईदच्या निमित्ताने मुंबईतील रहिवासी सोसायट्या, चाळी, रस्ते, चौक आणि खुल्या मैदानांमध्ये बकऱ्यांची बेकायदेशीर कत्तल केली जात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या विषयावर महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे सांगत त्यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांना लेखी निवेदन दिले आहे.

दिया मिर्झाप्रमाणे मुस्लिम सेलिब्रिटींनीही जनजागृती करावी! - 
दिवाळीच्या काळात प्रदूषण कमी करण्यासाठी अभिनेत्री दिया मिर्झाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. त्याच धर्तीवर बकरी ईदच्या वेळीही मुस्लिम धर्मातील अभिनेते, अभिनेत्री आणि धार्मिक नेत्यांच्या माध्यमातून खुल्या जागेत कत्तल करू नये, स्वच्छता राखावी आणि पर्यावरणाचे प्रदूषण टाळावे, असे आवाहन करणारे अभियान महापालिकेने राबवावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

रहिवासी परिसरातील कत्तलींवर बंदीची मागणी - 
शिवाजीनगर, गोवंडी, मानखुर्द, कुर्ला, मालवणी, भायखळा, भेंडी बाजार, विक्रोळी पार्कसाइट, घाटकोपर पश्चिम, मुंबादेवी आणि गोलदेवल या परिसरांमध्ये खुलेआम कत्तल होत असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. रहिवासी सोसायट्या आणि चाळींमध्ये अशा प्रकारे कत्तल करण्यास परवानगी देऊ नये. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींकडे महापालिका अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करू नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

महापालिकेने स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून द्यावी - 
मुस्लिम बांधवांना धार्मिक विधीसाठी बकऱ्यांची कत्तल करायची असल्यास महापालिकेने जवळच्या बाजारपेठांमध्ये, दुकानांमध्ये किंवा आवश्यकतेनुसार स्वतंत्र स्टॉलची व्यवस्था करून द्यावी. खुल्या जागेत मंडप उभारून कत्तलीची परवानगी देण्यासंबंधीच्या तरतुदीचा फेरविचार करावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. तसेच रक्त आणि सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

पालिकेत पुन्हा राजकीय संघर्षाची शक्यता - 
दिया मिर्झाच्या प्रदूषणविषयक व्हिडिओवरून यापूर्वीच मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत भाजप आणि विरोधकांमध्ये वाद झाला होता. आता त्याच जनजागृतीच्या मुद्द्याचा संदर्भ देत सोमय्या यांनी बकरी ईदसाठी मुस्लिम सेलिब्रिटींच्या सहभागाची मागणी केली आहे. त्यामुळे धार्मिक सण, पर्यावरण, स्वच्छता आणि महापालिकेचे नियम या मुद्द्यांवरून पालिकेतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS