
मुंबई JPN NEWS - मुलुंड पश्चिमेतील नाहुरगाव परिसरातील मुंबई पब्लिक स्कूलच्या जुन्या चाळवजा इमारतीला पर्याय म्हणून आधुनिक आणि सर्व सुविधांनी युक्त नवीन शाळेची इमारत उभारण्याची मागणी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी केली आहे. यासाठी सन २०२७-२८ च्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली.
नाहुरगाव येथील मुंबई पब्लिक स्कूल सध्या जुन्या आणि अपुऱ्या जागेच्या इमारतीत सुरू आहे. मर्यादित वर्गखोल्या आणि आधुनिक शैक्षणिक सुविधांचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक वातावरण मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सध्याची इमारत पाडून त्या जागी प्रशस्त आणि बहुमजली शाळेची इमारत उभारण्याची आवश्यकता असल्याचे गंगाधरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
विज्ञान प्रयोगशाळेपासून डिजिटल शिक्षणापर्यंत सुविधा -
नवीन शाळेच्या इमारतीमध्ये सुसज्ज वर्गखोल्या, विज्ञान व संगणक प्रयोगशाळा, आधुनिक ग्रंथालय, डिजिटल शिक्षण सुविधा, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खेळासाठी जागा आणि बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात यावे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुलभ प्रवेश व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पालिका शाळांवरील विश्वास वाढविण्याचा प्रयत्न -
महापालिका शाळांमध्ये खासगी शाळांच्या तोडीच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्यास सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळेल. आधुनिक सुविधांमुळे पालकांचा महापालिका शाळांवरील विश्वास वाढेल आणि अधिकाधिक विद्यार्थी या शाळांकडे आकर्षित होतील, असे गंगाधरे यांनी सांगितले.
अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची मागणी -
या प्रकल्पासाठी संबंधित विभागाने जागेची आणि तांत्रिक बाबींची पाहणी करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. तसेच नवीन शाळेच्या बांधकामासाठी सन २०२७-२८ च्या महापालिका अर्थसंकल्पात स्वतंत्र लेखाशीर्षांतर्गत निधीची तरतूद करावी, अशी आग्रही मागणी गंगाधरे यांनी आयुक्तांकडे केली आहे. आता या मागणीवर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नाहुरगाव परिसरातील नागरिक आणि पालकांचे लक्ष लागले आहे.


No comments:
Post a Comment