
मुंबई JPN NEWS - राज्यातील MBBS इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी MBBS इंटर्न डॉक्टरांचे मासिक विद्यावेतन २५ हजार रुपये करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे राज्यातील वैद्यकीय इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनवाढीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ASMI महाराष्ट्रच्या प्रतिनिधींनी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन विद्यावेतनवाढीचा मुद्दा मांडला. या बैठकीत MBBS इंटर्न डॉक्टरांना सध्या मिळणाऱ्या विद्यावेतनात वाढ करून ते २५ हजार रुपये करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीवर सकारात्मक भूमिका घेत मंत्री मुश्रीफ यांनी संबंधित प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल, असे स्पष्ट केले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा -
या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (DMER) प्रधान सचिव, संचालक, आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ASMI महाराष्ट्रच्या वतीने डॉ. ऋषी सांगले, डॉ. प्रथमेश पतंगे, डॉ. पवनराजे, डॉ. रमन पवार, डॉ. यश आणि डॉ. रोहित यांनी सहभाग घेतला.
शासन निर्णयासाठी दोन महिन्यांचा अंदाज -
विद्यावेतनवाढीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून अधिकृत शासन निर्णय (GR) जारी होण्यासाठी अंदाजे दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
याबाबत ASMI महाराष्ट्रचे उपाध्यक्ष डॉ. प्रथमेश पतंगे म्हणाले, "शासनाने दिलेल्या आश्वासनाबाबत आम्ही अत्यंत सकारात्मक आहोत. मंत्रिमंडळाची मान्यता मिळून ही मागणी लवकरच प्रत्यक्षात येईल, असा आम्हाला विश्वास आहे."
दरम्यान, मंत्रिमंडळाची मान्यता आणि शासन निर्णय कधी जारी होतो, याकडे राज्यातील MBBS इंटर्न डॉक्टरांचे लक्ष लागले आहे.


No comments:
Post a Comment