महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 November 2026

महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले


मुंबई JPN NEWS - महावितरणच्या भांडुप येथील स्थापत्य विभागातील कार्यकारी अभियंत्याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. देवेंद्र गिलुरकर (वय ५१) असे ताब्यात घेतलेल्या अभियंत्याचे नाव आहे. तक्रारदाराने केलेल्या शासकीय सिव्हिल कामांची सुमारे २१ लाख रुपयांची थकीत बिले मंजूर करून देण्यासाठी त्यांनी १ लाख ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. या रकमेतील पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये स्वीकारताना २ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित तक्रारदाराने २६ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने जून २०२६ पासून केलेल्या शासकीय सिव्हिल कामांची वेगवेगळी बिले प्रलंबित होती. ही अंदाजे २१ लाख रुपयांची बिले मंजूर करून देण्यासाठी संबंधित लोकसेवकाने १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

पडताळणीत लाचेच्या मागणीला दुजोरा - 
तक्रारीच्या अनुषंगाने ३० ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. या वेळी संबंधित अभियंत्याने १ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शवून ही रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यास सांगितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानुसार पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती एसीबीच्या अहवालात देण्यात आली आहे.

५० हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले - 
२ नोव्हेंबर २०२६ रोजी एसीबीने सापळा रचला. या कारवाईदरम्यान भांडुप येथील महावितरणच्या स्थापत्य विभागात कार्यकारी अभियंता देवेंद्र गिलुरकर यांना तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

कारवाईनंतर संबंधित अभियंत्याची अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्यांचा एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. घरझडतीची तजवीज ठेवण्यात आली असून, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीच्या अहवालात देण्यात आली आहे.

एसीबीच्या पथकाकडून कारवाई - 
ही कारवाई पर्यवेक्षक अधिकारी सहायक पोलीस आयुक्त प्रवीण नावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रतिभा राजेंद्र ढोकणे यांनी केली. पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS