
मुंबई JPN NEWS - राज्यातील वाहनधारक, विद्यार्थी, शेतकरी, पशुपालक आणि सहकारी संस्थांसाठी महत्त्वाचे निर्णय घेत महाराष्ट्र मंत्रिमंडळाने विविध विभागांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. वाहनांवरील प्रलंबित ई-चलन दंड भरण्यासाठी २० टक्क्यांपर्यंत सवलत देणारी 'महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलन अभय योजना-२०२६' राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे.
पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप भत्त्यात वाढ, पालघर जिल्ह्यात तीन ग्राम न्यायालयांची स्थापना, मुखेड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र उभारण्यासह एकूण ११ महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतले आहेत.
वाहनधारकांना ई-चलन दंडात २० टक्क्यांपर्यंत सवलत -
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे वाहनांवर आकारण्यात आलेल्या प्रलंबित दंडाच्या वसुलीसाठी 'महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलन अभय योजना-२०२६' राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रलंबित चलनाच्या दंडाच्या रकमेवर एकवेळची बाब म्हणून २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना थकबाकीचा दंड भरून आपली प्रलंबित चलन प्रकरणे निकाली काढण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे वाहनधारकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात दुपटीहून अधिक वाढ -
इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार विभागस्तरीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा १,५०० रुपये, तर जिल्हास्तरीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दरमहा १,३०० रुपये निर्वाह भत्ता मिळणार आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या या निर्णयामुळे वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे.
पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप भत्त्यात वाढ -
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील पशुचिकित्सालयांमध्ये सेवा देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, हा या निर्णयामागील उद्देश आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांना पशुधनाच्या उपचारांसाठी अधिक मदत उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे.
पालघरमध्ये तीन ग्राम न्यायालयांची स्थापना -
पालघर जिल्ह्यातील तलासरी, मोखाडा आणि विक्रमगड येथे तीन ग्राम न्यायालये स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्येक न्यायालयासाठी पाच याप्रमाणे एकूण १५ अनुषंगिक पदे निर्माण करण्यास आणि त्यासाठी आवश्यक खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर न्याय मिळविण्याची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे.
मुखेड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय -
नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या जोड न्यायालयाऐवजी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे नियमित न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती आणि खर्चाच्या तरतुदीलाही मंजुरी देण्यात आली आहे.
नागपूरमध्ये ६४४ कोटींचे आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र -
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागपूर येथील कृषी महाविद्यालयाच्या दाभा परिसरातील जागेवर आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्राच्या ६४४ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या केंद्रामुळे कृषी क्षेत्रातील सुविधा, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
बिडगाव-तरोडी नगरपंचायतीला प्रशासकीय इमारतीसाठी जमीन -
नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील बिडगाव-तरोडी (खुर्द) नगरपंचायतीला प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी १ हेक्टर ८६ आर जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे नगरपंचायतीच्या स्वतंत्र प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा होणार आहे.
गोंदियातील घरांसाठी दिलेल्या जमिनी वर्ग-१ मध्ये विनामूल्य रूपांतरित होणार -
गोंदिया शहरात लिलावाद्वारे किंवा भाडेतत्त्वावर घरांसाठी देण्यात आलेल्या जमिनींचे विनामूल्य वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे संबंधित जमिनीधारकांना दिलासा मिळणार आहे. जमिनींच्या मालकी हक्क आणि हस्तांतरणाशी संबंधित अडचणी दूर होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
सिद्धिविनायक मंदिर न्यासाला मुद्रांक शुल्कातून सूट -
मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने खरेदी केलेल्या राम मेन्शन इमारतीच्या खरेदी व्यवहारावरील मुद्रांक शुल्क माफ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मंदिर परिसराचा विकास आणि भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठाच्या अधिसूचनेत सुधारणा -
मुंबईतील हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठाच्या समूह विद्यापीठातील कुलाधिकारी पदाच्या कार्यकाळ आणि वयोमर्यादेची अट वगळण्यासाठी अधिसूचनेत सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच कुलगुरू पदावर कार्यरत असलेली व्यक्ती पुनर्नियुक्तीस पात्र ठरावी, यासाठीही आवश्यक बदल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
सहकारी संस्थांबाबत दोन महत्त्वपूर्ण निर्णय -
मुदत संपलेल्या 'अ' वर्गातील आणि दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित झालेल्या १८ सहकारी संस्थांवर प्रशासकांची नियुक्ती केली जाणार नाही. यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अंतर्गत समितीच्या निवडणुकीसंदर्भातील नियम २०१४ मधील नियम ४ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
तसेच वार्षिक उलाढाल ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असलेल्या सहकारी संस्थांच्या समित्यांवर शासननियुक्त पाच सदस्यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये सहाय्यक निबंधक दर्जापेक्षा कमी नसलेला एक शासकीय अधिकारी आणि संबंधित संस्थेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या चार व्यक्तींचा समावेश असेल.
शासकीय अधिकाऱ्याला मतदानाचा अधिकार नसेल; मात्र अन्य चार सदस्यांना संचालक मंडळात मतदानाचा अधिकार असेल. हे चार सदस्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीस पात्र राहणार नाहीत. हा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना लागू राहणार नाही. यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ अअअ (२) च्या परंतुकात नवीन तरतूद समाविष्ट करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.


No comments:
Post a Comment