३०० चौ. फुटांच्या जागेतही सुरू होणार महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 November 2026

३०० चौ. फुटांच्या जागेतही सुरू होणार महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र


मुंबई JPN NEWS - युवकांना रोजगारक्षम बनवून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकासाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता राज्यात केवळ ३०० चौरस फुटांच्या जागेतही ‘महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ सुरू करता येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील १०० केंद्रांना मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी १२ केंद्रांचे उद्घाटन गुरुवारी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, या केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

मेट्रो चौक येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलच्या आवारातील दक्ष हॉल येथे या योजनेचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. कौशल्य विकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश कौशल्य प्रशिक्षणाची सुविधा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित न ठेवता गावागावांत, वस्त्यांमध्ये आणि दुर्गम भागांतील युवकांपर्यंत पोहोचविणे हा आहे.

यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, ‘महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ हा भारतातील पहिला उपक्रम आहे. राज्यातील झोपडपट्ट्या, दुर्गम आणि डोंगराळ भाग, नक्षलग्रस्त क्षेत्रे तसेच आदिवासी व ग्रामीण भागांतील गरजू युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता होती. मात्र, आता प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गत (PMKUVA) जागेच्या निकषांमध्ये शिथिलता देण्यात आली असून, किमान ३०० ते १,५०० चौरस फुटांच्या जागेतही प्रशिक्षण केंद्र सुरू करता येणार आहे.

या पहिल्या टप्प्यात नागपूर, डहाणू-पालघर, नंदुरबार, यवतमाळ, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग आणि जळगाव या जिल्ह्यांतील १२ कौशल्य प्रशिक्षण केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे स्थानिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना कौशल्य प्रशिक्षणाच्या विस्तारात सहभागी होता येणार आहे. उपलब्ध स्थानिक पायाभूत सुविधांचा वापर करून अधिकाधिक युवकांपर्यंत प्रशिक्षण पोहोचविणे शक्य होणार असल्याचे लोढा यांनी सांगितले.

२०२६ हे वर्ष क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. याचे औचित्य साधून प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गत स्थापन होणाऱ्या सर्व कौशल्य विकास केंद्रांना ‘महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ असे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या गावी या उपक्रमाची घोषणा केली होती. महात्मा फुले यांच्या व्यावसायिक शिक्षणाच्या विचारांना अनुसरून युवकांना आधुनिक बाजारपेठेच्या गरजांनुसार कौशल्य प्रशिक्षण देणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले.

या केंद्रांना विशेषतः झोपडपट्ट्या, झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रे, दुर्गम आणि डोंगराळ भाग, नक्षलग्रस्त क्षेत्रे, आदिवासी भाग तसेच ग्रामीण परिसरात प्राधान्याने सुरू करण्यात येणार आहे. गावठाणे, आकांक्षित जिल्हे आणि तालुक्यांपर्यंत प्रशिक्षण सुविधा पोहोचविण्यावर शासनाचा भर राहणार आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांतील युवकांना कौशल्य प्रशिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

या प्रशिक्षण केंद्रांमध्ये उद्योगांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रशिक्षणासोबत कौशल्य प्रमाणपत्र आणि रोजगार यांची सांगड घालण्यावर भर दिला जाणार आहे. केवळ प्रशिक्षण देऊन योजना थांबणार नसून, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. या योजनेचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षणासाठी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे कौशल्य प्रशिक्षणापासून वंचित राहणाऱ्या युवकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

नामांकित सामाजिक, शैक्षणिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. स्थानिक संस्था, उद्योग आणि शासन यांच्या समन्वयातून स्थानिक युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच उद्योगांसाठी आवश्यक कौशल्याधारित मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागांतील कौशल्य प्रशिक्षणाच्या उपलब्धतेतील तफावत कमी करणे, आर्थिक समावेशनाला चालना देणे आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून युवकांना आत्मनिर्भर बनविणे, हा या योजनेचा व्यापक दृष्टिकोन आहे.

या कार्यक्रमाला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे आयुक्त डॉ. अमित सैनी, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

युवकांसाठी रोजगाराची संधी - 
राज्यातील १०० केंद्रांना पहिल्या टप्प्यात मान्यता देऊन १२ केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले आहे. आता ३०० चौरस फुटांच्या जागेतही प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने या योजनेचा विस्तार अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी यांची प्रभावी सांगड घालून कौशल्यसंपन्न, रोजगारक्षम आणि आत्मनिर्भर युवा महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS