
मुंबई JPN NEWS - मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २००९ मध्ये घडलेल्या खून प्रकरणातील तब्बल १७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. फिरोज मोहम्मद सुलेमान शेख (वय ३९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला टिटवाळा पूर्व येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपी आपली ओळख आणि अस्तित्व लपवून टिटवाळ्यातील एका बांधकामाच्या ठिकाणी फिटर म्हणून काम करत होता. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुलुंड पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जून २००९ रोजी फिरोज, अफरोज आणि त्यांच्या अन्य दोन साथीदारांनी संगनमत करून मसकूर यांची हत्या केली होती. फिरोजच्या भावाला मसकूर यांच्यासोबत काम करताना डोळ्यांना दुखापत होऊन कायमचे अंधत्व आले होते. तसेच गावाकडील जमिनीवरूनही त्यांच्यात जुना वाद होता. याच कारणांवरून आरोपींनी मसकूर यांच्या डोक्यात हातोडा मारून त्यांची हत्या केल्याची तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१८/२००९ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
१७ वर्षे पोलिसांना देत होता गुंगारा -
या गुन्ह्यातील आरोपी गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व लपवून राहत होता. पोलिसांनी त्याच्या मूळ गावी शोध घेतला, मात्र तो मिळून आला नव्हता. त्यामुळे त्याला पाहिजे आरोपी घोषित करण्यात आले होते. दरम्यान, आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास राहणे तसेच मोबाईल आणि सिमकार्ड बदलत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद लभडे आणि पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल महाजन यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू ठेवला. बिहारमधील गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवून तांत्रिक तपास आणि विश्लेषण करण्यात आले.
टिटवाळ्यात बांधकामाच्या ठिकाणी फिटर म्हणून काम -
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी बिहारमधील मूळ गावात न राहता टिटवाळा पूर्व येथील बनेली गाव परिसरात वास्तव्यास असल्याचे पोलिसांना समजले. तो एका बांधकामाच्या ठिकाणी फिटर म्हणून काम करत होता आणि कुटुंबासह तेथेच राहत होता.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी टिटवाळा पूर्व येथील लक्ष्मण चाळ, रूम क्रमांक २, बनेली चौक परिसरातून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव फिरोज मोहम्मद सुलेमान शेख असे सांगितले. त्याच्या नाव-पत्त्याची पडताळणी केल्यानंतर तो २००९ मधील खून प्रकरणातील फरार आरोपी असल्याची खात्री झाली.
पोलिसांनी अधिक तपास केला असता, जुन्या वादातून साथीदारांसह मसकूर यांच्या डोक्यात हातोडा मारून हत्या केल्याच्या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची कामगिरी -
ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोज कुमार, अपर पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त अभयसिंह देशमुख आणि सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन होनवडजकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या देखरेखीखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद लभडे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल महाजन आणि मुलुंड पोलीस ठाण्यातील अन्य अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.


No comments:
Post a Comment