
मुंबई JPN NEWS - मध्य रेल्वेने विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवार, १ नोव्हेंबर रोजी मुंबई विभागात मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे. सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या वेळेत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यानही ब्लॉक राहणार आहे.
डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर -
सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल ब्लॉकच्या कालावधीत जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील. त्यानंतर विद्याविहार येथे पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे या स्थानकांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकलच्या वेळापत्रकात बदल जाणवू शकतो.
अप धीम्या मार्गावरील लोकलचाही मार्ग बदलणार -
घाटकोपरहून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येतील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील. त्यामुळे अप दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे.
हार्बर आणि पोर्ट मार्गावरील सेवा सुरू -
हार्बर मार्गावरील सीएसएमटी-गोरेगाव आणि सीएसएमटी-पनवेल लोकल सेवा तसेच पोर्ट मार्गावरील नेरूळ/बेलापूर-उरण सेवा रविवारच्या नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे -
मेगाब्लॉकच्या काळात लोकलच्या मार्गात आणि थांब्यांमध्ये बदल होणार असल्याने प्रवाशांना त्यांच्या नेहमीच्या प्रवासासाठी अधिक वेळ लागू शकतो. विशेषतः सीएसएमटी, भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला, घाटकोपर आणि विद्याविहारदरम्यान प्रवास करणाऱ्यांनी ब्लॉकचे वेळापत्रक लक्षात घेऊन घराबाहेर पडावे. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत सूचना आणि स्थानकांवरील उद्घोषणांकडे लक्ष द्यावे.


No comments:
Post a Comment