
मुंबई JPN NEWS - मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईनवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) मेट्रो मार्गिका-३ वरील फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. सोमवार, २ नोव्हेंबरपासून कामकाजाच्या दिवशी ४६ अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मेट्रोच्या दैनंदिन फेऱ्यांची संख्या २९१ वरून थेट ३३७ झाली आहे.
या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत प्रवाशांना मेट्रोसाठी कमी प्रतीक्षा करावी लागणार असून, स्थानकांवरील गर्दीचे व्यवस्थापनही अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. विशेष म्हणजे, गर्दीच्या वेळेत दोन मेट्रो गाड्यांमधील अंतर ४ मिनिटे ५० सेकंदांवरून कमी करून ४ मिनिटे २५ सेकंद करण्यात आले आहे.
गर्दीच्या वेळेत प्रतीक्षा कालावधी घटणार -
ॲक्वा लाईनवरील प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने मेट्रो सेवांची वारंवारता वाढविण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे. नव्या वेळापत्रकानुसार गर्दीच्या वेळेत मेट्रो गाड्या आता अधिक कमी अंतराने उपलब्ध होतील. त्यामुळे कामावर जाणाऱ्या आणि कामावरून परतणाऱ्या प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे.
टप्प्याटप्प्याने वाढल्या मेट्रोच्या फेऱ्या -
आरे जेव्हीएलआर ते कफ परेड या संपूर्ण मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर दैनंदिन फेऱ्यांची संख्या २७१ करण्यात आली होती. त्यानंतर प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन २३ जून २०२६ रोजी फेऱ्यांची संख्या २८२, तर २८ सप्टेंबर २०२६ रोजी २९१ करण्यात आली. आता आणखी ४६ फेऱ्यांची भर पडल्याने कामकाजाच्या दिवशी ही संख्या ३३७ वर पोहोचली आहे.
शनिवार-रविवारी स्वतंत्र वेळापत्रक -
कामकाजाच्या दिवसांमध्ये फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली असली, तरी शनिवार आणि रविवारच्या दिवशी मेट्रो सेवा स्वतंत्र सप्ताहअखेरच्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत. प्रवाशांची संख्या आणि प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यातही सेवांच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यात येतील, असे एमएमआरसीने स्पष्ट केले आहे.
मुंबईकरांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. वाढलेल्या फेऱ्यांमुळे ॲक्वा लाईनवरील प्रवाशांना अधिक वारंवार आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.


No comments:
Post a Comment