Mumbai आशा स्वयंसेविकांना पहिल्यांदाच ५ हजारांची दिवाळी भेट!, महापौरांचा महत्त्वपूर्ण निर्णय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 November 2026

Mumbai आशा स्वयंसेविकांना पहिल्यांदाच ५ हजारांची दिवाळी भेट!, महापौरांचा महत्त्वपूर्ण निर्णय


मुंबई JPN NEWS -  मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तळागाळात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांची यंदाची दिवाळी अधिक आनंददायी होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील १,४६१ आशा स्वयंसेविकांपाठोपाठ राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत (NUHM) कार्यरत असलेल्या आणखी ७१९ आशा स्वयंसेविकांनाही प्रत्येकी ५ हजार रुपये भाऊबीज भेट देण्याचा निर्णय महापौर रितू तावडे यांनी घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण २,१८० आशा स्वयंसेविकांना प्रथमच प्रत्येकी ५ हजार रुपयांचे दिवाळी सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

यापूर्वी महानगरपालिकेच्या अखत्यारीतील १,४६१ आशा स्वयंसेविकांसाठी भाऊबीज भेट जाहीर करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या ७१९ आशा स्वयंसेविकाही या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी महापौर रितू तावडे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी प्रशासनाला निर्देश देत या स्वयंसेविकांचाही योजनेत समावेश करून घेतला.

आरोग्य व बालशिक्षण क्षेत्रातील भगिनींनाही दिवाळी भेट -
महानगरपालिकेने आशा स्वयंसेविकांसोबतच आरोग्य आणि बालशिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अन्य महिला कर्मचाऱ्यांच्याही योगदानाची दखल घेतली आहे. त्यानुसार २,३९३ सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना (CHV) प्रत्येकी १४ हजार रुपये, तर २,३६० बालवाडी शिक्षिका आणि मदतनिसांना प्रत्येकी ७ हजार रुपये भाऊबीज भेट दिली जाणार आहे.

मुंबईकरांच्या आरोग्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या आशा व आरोग्य स्वयंसेविका तसेच बालकांच्या शिक्षणाचा पाया घालणाऱ्या बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस या महानगरपालिकेच्या यंत्रणेचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत सर्व भगिनींची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने हा सर्वसमावेशक निर्णय घेण्यात आल्याचे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS