सर्वोच्च न्यायालयाचा मान, उच्च न्यायालयाच्या आदेशाला विलंब? पालिकेच्या दुहेरी भूमिकेची चर्चा! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 November 2026

सर्वोच्च न्यायालयाचा मान, उच्च न्यायालयाच्या आदेशाला विलंब? पालिकेच्या दुहेरी भूमिकेची चर्चा!


मुंबई JPN NEWS - न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करताना मुंबई महापालिका प्रशासनाची भूमिका वेगवेगळी का? सर्वोच्च न्यायालयाने आयुक्त अश्विनी भिडे यांचे वेतन रोखण्याचे निर्देश दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात बोरीवलीतील आरक्षित बसस्थानकाच्या जागेवरील २७ व्यावसायिक बांधकामांवर महापालिकेने हातोडा चालवला. मात्र, अभिनेत्री दिया मिर्झाचा प्रदूषण जनजागृती करणारा व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने देऊनही प्रशासनाने अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे एका न्यायालयाच्या आदेशानंतर तातडीने कारवाई आणि दुसऱ्या न्यायालयाच्या निर्देशांबाबत दिरंगाई, असा विरोधाभास समोर आला आहे.

वेतन रोखण्याचे आदेश अन् दुसऱ्याच दिवशी अतिक्रमणांवर कारवाई! - 
बोरीवली पूर्व येथील बेस्ट बसस्थानकासाठी आरक्षित असलेल्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी १३ नोव्हेंबर २०२५ आणि २८ जुलै २०२६ रोजी आदेश दिले होते. मात्र, त्यांची अंमलबजावणी न झाल्याने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच आयुक्त आणि त्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे निर्देश दिले. महापालिकेला पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.

या आदेशानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत ४ नोव्हेंबर रोजी बोरीवलीतील आरक्षित जागेवरील २७ व्यावसायिक बांधकामे हटवली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात प्रशासनाने कारवाईची माहिती दिली. महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता आर. पी. भट यांनी न्यायालयाला याबाबत अवगत केले.

सर्वोच्च न्यायालयाने वेतनावरील निर्बंध मागे घेतले - 
महापालिका प्रशासनाने आवश्यक कार्यवाही केल्याचे न्यायालयाला सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ३ नोव्हेंबरच्या आदेशातील परिच्छेद क्रमांक १ ते ३ मागे घेतले. त्यामुळे आयुक्तांविरुद्धची कारणे दाखवा नोटीस आणि वेतन रोखण्याचे निर्बंध मागे घेण्यात आले. मात्र, न्यायालयाने प्रशासनाच्या कार्यवाहीचे पूर्ण पालन झाले आहे की नाही, यावर कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. आयुक्तांना पुढील सुनावणीपूर्वी केलेल्या कार्यवाहीचा तपशील देणारे वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आदेशातील परिच्छेद क्रमांक ५ आणि ६ कायम ठेवण्यात आले आहेत.

मग दिया मिर्झाच्या व्हिडिओबाबत प्रशासनाची चालढकल का? - 
दुसरीकडे, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतरही अभिनेत्री दिया मिर्झाचा प्रदूषण जनजागृती करणारा व्हिडिओ महापालिकेच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अद्याप पुन्हा अपलोड करण्यात आलेला नाही. दिवाळीत फटाके फोडल्याने होणारे वायू आणि ध्वनिप्रदूषण टाळण्याचे आवाहन करणारा हा व्हिडिओ भाजपच्या काही नेत्यांच्या आक्षेपानंतर हटविण्यात आला होता.

या प्रकरणाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्यास सांगितले होते. पर्यावरणाच्या प्रश्नाला राजकीय किंवा धार्मिक रंग देऊ नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्देशानंतरही पालिका प्रशासनाने व्हिडिओ पुन्हा अपलोड केलेला नाही. प्रशासनाने न्यायालयाच्या निर्देशांचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्याची भूमिका घेतली आहे.

न्यायालयाच्या आदेशांबाबत प्रशासनाचे वेगवेगळे निकष? -
एका प्रकरणात आयुक्तांच्या वेतनावर निर्बंध आल्यानंतर तातडीने अतिक्रमण हटविण्याची कारवाई होते; मात्र दुसऱ्या प्रकरणात प्रदूषण जनजागृतीच्या व्हिडिओबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश असूनही अंमलबजावणीला विलंब होतो. त्यामुळे प्रशासन न्यायालयाच्या आदेशांना समान गांभीर्याने घेत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई केली, मग मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी विलंब का? न्यायालयाचा अवमान होण्याची वेळ येण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? असा सवाल या संपूर्ण प्रकरणातून उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS