
मुंबई JPN NEWS - मिठी नदी गाळसफाई प्रकरणात ज्या व्हर्गो कंपनीचे नाव पुढे आले होते आणि याच प्रकरणावरून भाजपने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते, त्याच कंपनीला आता मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पुन्हा काम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावर काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी भाजपला थेट सवाल करत प्रशासनाला जाब विचारला. कालपर्यंत आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्या भाजपला आता त्याच कंपनीला काम देताना काय स्पष्टीकरण द्यायचे आहे? मग आदित्य ठाकरेंवरील आरोप चुकीचे होते का? असा सवाल आझमी यांनी उपस्थित केला.
मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामात कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये व्हर्गो कंपनीचे नाव चर्चेत आले होते. या प्रकरणाचा आधार घेत भाजपकडून आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने आरोप करण्यात आले होते. मात्र, आता त्याच कंपनीचा समावेश असलेला प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत मंजुरीसाठी येत असल्याने भाजपच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे आझमी यांनी म्हटले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करूनच प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
३६ कोटींचे काम, भाजपला आधी माहिती नव्हती का? -
भांडुप संकुलातील ९०० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलप्रक्रिया केंद्रातील प्लॅट ट्यूब क्लॅरिफायरच्या पीव्हीसी प्रोफाइल शीट्स बदलण्याचा सुमारे ३६ कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. या कामासाठी सुएझ इंडिया आणि व्हर्गो स्पेशालिटीज या दोन कंपन्यांनी निविदेला प्रतिसाद दिला होता.
या प्रस्तावावर आझमी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. हा प्रस्ताव येणार असल्याची सत्ताधारी भाजपला आधीपासून माहिती नव्हती का? मिठी नदी गाळसफाई प्रकरणात चर्चेत आलेल्या कंपनीला ईडीने क्लीन चिट दिली आहे का? कंपनीला यापूर्वी ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते का? तसे असेल तर त्याच कंपनीला पुन्हा काम देण्याचा निर्णय कसा घेतला जात आहे? असे सवाल त्यांनी केले. केवळ आरोप-प्रत्यारोप न करता या प्रस्तावाची सखोल चौकशी व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
कंपनीला ब्लॅकलिस्ट केलेले नाही; एका व्यक्तीवर गुन्हा -
आझमी यांच्या प्रश्नांना उत्तर देताना अतिरिक्त आयुक्तांनी प्रशासनाची बाजू स्पष्ट केली. भांडुप संकुलातील संबंधित कामासाठी यापूर्वी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. व्हर्गो कंपनीशी संबंधित एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला होता; मात्र कंपनीच्या नावावर गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणात पालिकेच्या विधी विभागाचा सल्ला घेण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती आता कंपनीत कार्यरत नाही. तसेच कंपनीला अधिकृतपणे ब्लॅकलिस्ट करण्यात आलेले नसल्याने निविदा प्रक्रियेत कंपनीचा सहभाग ग्राह्य धरण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले.
कंपनीला ब्लॅकलिस्ट केले नाही -
प्रशासनाने कंपनीला ब्लॅकलिस्ट केले नसल्याचे आणि गुन्हा हा कंपनीऐवजी एका व्यक्तीविरोधात असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, आझमी यांनी उपस्थित केलेला ईडीच्या क्लीन चिटचा मुद्दा आणि मिठी नदी गाळसफाई प्रकरणातील आरोपांची सत्यता याबाबत स्वतंत्र स्पष्टता मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.


No comments:
Post a Comment