Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

२२ ते २५ डिसेंबर हार्बर मार्गावर मेगाब्लॉक


मुंबई । प्रतिनिधी - मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर नेरुळ-सीवूड-उरण या नवीन उपनगरीय रेल्वे मार्गाच्या कामांना गती देण्यासाठी हार्बरवर नेरुळ ते बेलापूपर्यंत २२ डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान चार दिवसाचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकपैकी २५ डिसेंबर म्हणजेच नाताळच्या दिवशी १३ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हार्बरवर सीएसएमटी ते नेरुळपर्यंतच लोकल गाडय़ा चालवताना अनेक गाडय़ा रद्द करण्यात येणार आहेत.

नेरुळ-सीवूड-उरण प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात १९९७ मध्ये सुरुवात करण्यात आली. अनेक अडथळ्यामुळे प्रकल्प रखडत गेला. त्यामुळे ५०० कोटी रुपयांचा असलेल्या प्रकल्पाचा खर्च एक हजार ७१८ कोटी रुपयांवर पोहोचला. प्रकल्प सिडको आणि मध्य रेल्वेकडून भागिदारीत केला जात आहे. या मार्गावर अकरा स्थानके असतील आणि आठ किलोमीटरचा पहिला टप्पा खारकोपर या नवीन स्थानकापर्यंत सुरू केला जाणार आहे. नेरुळ-सीवूड-उरण २८ किलोमीटरचा नवीन उपनगरीय रेल्वे मार्गाचे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. या मार्गातील नेरुळ ते खारघर हा पहिला आठ किलोमीटरचा टप्पा मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वेने ठेवले आहे. तर उर्वरित दुसरा टप्पा डिसेंबर २०१९ पर्यंत खुला करण्याचा प्रयत्न आहे. नवीन मार्गामुळे नवी मुंबई उरणशी जोडली जाणार आहे. रेल्वेकडून या मार्गावर प्रवाशांसाठी नवीन लोकलही चालविण्याचा विचार केला जात आहे. परंतु या मार्गातील कामे पूर्णत्वास नेण्यासाठी मध्य रेल्वेकडून मध्यरात्री गाडय़ांची वर्दळ बंद होताच काही छोटी कामे केली जात आहेत. मात्र रेल्वे रुळांसह काही मोठी तांत्रिक कामे बाकी असून त्यासाठी जादा वेळेची आवशक्ता आहे आणि मध्य रेल्वेला ब्लॉक घेऊन कामे करण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी २२ डिसेंबर ते २५ डिसेंबपर्यंत नेरुळ ते बेलापूर दरम्यान ब्लॉक घेऊन महत्त्वाची काम करण्याचे नियोजन केले आहे. या कामासाठी एकूण ७०० कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. पहिल्या तीन दिवसांत छोटे ब्लॉक घेऊन काम केले जातील. त्यावेळीही काही प्रमाणात लोकल गाडय़ा रद्द करण्यात येणार आहेत. त्यावेळी बेलापूर स्थानकातील फलाट क्रमांक १ आणि ३ वरूनच लोकल गाडय़ांची वर्दळ सुरु राहणार आहे. तर फलाट दोन बंद ठेवण्यात येईल.

२५ डिसेंबरला नेरुळ - पनवेल लोकल बंद - 
२५ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेकडून १३ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. यावेळी सीएसएमटीपासून ते नेरुळपर्यंतच सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. नेरुळनंतर पनवेलपर्यंत लोकल गाडय़ा धावणार नाही. सुटुटीचा दिवस असल्याने प्रवाशांची लोकल गाडय़ांना गर्दीही कमी असेल याचा अंदाज घेऊन त्या दिवशी हार्बरवर कमी लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom