पालिका रुग्णालयात आयसीयू, व्हेंटिलेटरची कमतरता - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 December 2017

पालिका रुग्णालयात आयसीयू, व्हेंटिलेटरची कमतरता


मुंबई | प्रतिनिधी - महापालिकेच्या रुग्णालयात आयसीयू आणि व्हेंटिलेटर उपलब्ध नसतात, अशी नेहमीच तक्रार असते. गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा आयसीयू आणि व्हेंटिलेटरचा मुद्दा गाजला. यावेळी पालिका रुग्णालयात किती आयसीयू आणि व्हेंटीलेटर सुरु आहेत, याची आकडेवारी सादर करावी, अशी जोरदार मागणी शिवसेनेने स्थायी समितीत लावून धरली. अखेर पुढील आठवड्यात सदर माहिती समितीला देण्याचे प्रशासनाने मान्य केले.

मुंबई महानगरपालिकेच्या परेल येथील केईएम रुग्णालयात १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१७ दरम्यान बेअर १००० व्हेंटिलेटर या उपकरणाचे परिरक्षण करण्यासाठी लाईफ केअर मेडिकल सिस्टिम्स या कंपनीबरोबर करार केला होता. प्रशासनाने याबाबत प्रस्ताव स्थायी समितीच्या माहितीसाठी सादर केला. या प्रस्तावावर बोलताना राजुल पटेल यांनी, रुग्णालयातील व्हेंटीलेटर व आयसीयूचा मुद्दा उपस्थित केला. पालिका रुग्णालयात नेहमीच आयसीयू खाली नसल्याचे सांगण्यात येते. एखाद्या पेशंटला तातडीने व्हेंटिलेटर आवश्यक असल्यास तेसुद्धा उपलब्ध होत नाहीत. सेवा सुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, रुग्णालयात व्हेंटीलेटर व आयसीयू उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे हाल होतात. त्यामुळे पालिकेने सध्या किती आयसीयू, व्हेंटिलेटर सुरू आहेत, याची आकडेवारी सादर करावी अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी याबाबतची सविस्तर आकडेवारीची लेखी स्वरूपात देण्याची प्रशासनाला सुचना केली. प्रशासनानेही पुढील आठवड्यात माहिती देण्याचे मान्य केले.

Post Bottom Ad