Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

आगीची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा - सचिन अहिर


मुंबई । प्रतिनिधी - कमला मिल कम्पाऊंड परिसरातील आगीच्या घटनेची फक्त आयुक्त स्तरावर चौकशी करून भागणार नाही, तर या संपुर्ण प्रकरणात प्रशासन आणि हॉटेल प्रशासनाचा निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येत असल्याने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई विभागिय अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली. शुक्रवारी पहाटे झालेल्या या दुर्घटनेनंतर अहिर यांनी घटनास्थळाला भेट दिली. संबंधित दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या १४ नागरिकांच्या निधनाबद्दल त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले.

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुंबईतील कमला मिल कम्पाऊंड परिसरातील हॉटेल्सला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगत, अहिर म्हणाले की, घटनास्थळाची पाहणी केली असता, प्रशासकीय आणि हॉटेल व्यवस्थापन स्तरावर बऱ्याच त्रुटी आढळून आल्या. या हॉटेलमध्ये नियमितपणे फायर शो चालत असल्याची बाब समोर आली आहे. तसेच हॉटेलच्या मोकळ्या जागेवर वेदरशेडची परवानगी असतानाही बारमाही वापरात असलेले छप्पर असल्याचे आढळून आले. त्यामुळे आग ही हॉटेलच्या अंतर्गत भागात पसरून धुराचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाल्याचे सांगत मा. अहिर यांनी मृतांमध्ये अनेकजण हे आगीच्या भक्षस्थानी पडून होरपळून नव्हे तर धुराने गुदमरून मरण पावल्याकडे लक्ष वेधले. या संपुर्ण प्रकरणाला हॉटेल व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा आणि महापालिका प्रशासनाचा भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचे ते म्हणाले. तसेच ज्या प्रशासनाचा निष्काळजीपणा या दुर्घटनेला कारणीभूत ठरला, त्याच प्रशासनाच्या प्रमुखाकडून म्हणजे महापालिका अायुक्तांकडून या दुर्घटनेची चौकशी करण्याऐवजी स्वतंत्रपणे न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच या घटनेमुळे संपुर्ण मुंबईकरांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे. म्हणून या घटनेपासून बोध घेत मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि बँक्वेट हॉल्सचे तातडीने फायर ऑडिट करून या ऑडिट दरम्यान एकाद्या हॉटेलने नियमभंग केल्याचे दिसल्यास तात्काळ त्या हॉटेलचा परवाना रद्द करण्याची मागणीही अहिर यांनी केली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom