२५ डिसेंबर पासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल धावणार - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 December 2017

२५ डिसेंबर पासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल धावणार


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईमधील रेल्वे प्रवाशांच्या सेवेत एसी लोकल येणार हे गेले काही वर्षे चर्चिले जात होते. आता हि चर्चा संपली आहे. सोमवारी ख्रिसमस आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पश्चिम रेल्वेवर पहिली एसी लोकल चालवली जाणार आहे. २५ डिसेंबर पासून दुपारी २. १० वाजता पहिली एसी लोकल अंधेरी येथून सुटेल आणि ती चर्चगेटपर्यंत धावेल. हि लोकल संपूर्ण भारतीय बनावटीची असून लोकलचे तिकीट ६० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत असणार आहे. यामुळे सोमवारपासून पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना एसी लोकलने प्रवासाचा प्रत्यक्षात अनुभव घेता येणार आहे.

चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) ही एसी लोकल तयार करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाने व पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांनी सुरक्षिततेबाबतचे प्रमाणपत्र दिल्यानंतर ही लोकल सेवा सुरु करण्यात येणार आहे. ही लोकल विरार ते चर्चगेट जलद मार्गावर चालविली जाणार आहे. या लोकलला चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, भाईंदर, वसई, विरार असे थांबे देण्यात आले आहेत. ही लोकलसेवा यशस्वी झाल्यास आयसीएफने आणखी ११ एसी लोकल बनविण्याची तयारी दर्शविली आहे.

एसी लोकलचे तिकीट फर्स्ट क्लासच्या किमान तिकिटाच्या १.३ पट असेल. एसी लोकल तिकिटांबाबत पहिल्या सहा महिन्यांसाठी १० टक्के सवलतही देण्यात आली आहे. या तिकिटांवर पूर्वीच्या सेवाकराऐवजी लोकलच्या तिकीट, पासबाबत सूत्र मांडताना रेल्वे बोर्डाने त्यात जीएसटीही अंतर्भूत असेल. त्यात आवश्यकतेनुसार मुंबई शहर वाहतूक प्रकल्पा अंतर्गत (एमयूटीपी) अधिभारही समाविष्ट करण्याची सूचना बोर्डाने केली आहे. एसी तिकीट, पासधारकांना नियमित फर्स्ट क्लासमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. एसी लोकलचे साप्ताहिक, पंधरवडा आणि मासिक पास देण्यात येणार आहेत.

एसी लोकलमधील प्रवाशांची क्षमता ५ हजार ९६४ असून त्यात १ हजार २८ आसने आहेत. या गाडीचा वेग प्रतितास ११० किलोमिटर असणार आहे. एसी लोकल सोमवार ते शुक्रवार अशी पाच दिवस चालणार असून शनिवार-रविवारी या लोकलला विश्रांती दिली जाणार आहे. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रे असतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही रेल्वे बोर्डाने दिली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांना एसी लोकल पाहता यावी यासाठी मुंबई सेंट्रल स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर एसी लोकल उभी करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत ही लोकल मुंबईकर पाहू शकणार आहेत.

तिकीटदर - 
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ६० रु.
चर्चगेट ते दादर ९० रु.
चर्चगेट ते वांद्रे ९० रु.
चर्चगेट ते अंधेरी १३५ रु.
चर्चगेट ते बोरिवली १८५ रु.
चर्चगेट ते भाईंदर २०५ रु.
चर्चगेट ते वसई २१० रु.
चर्चगेट ते विरार २२० रु.

वेळापत्रक - 
बोरिवली (स. ७.५४) ते चर्चगेट (स. ८.५०)
चर्चगेट (स. ८.५४) ते विरार (स. १०.१३)
विरार (स. १०.२२) ते चर्चगेट (स. ११.१६)
चर्चगेट (स. ११.५०) ते विरार (दु. १.०५)
विरार (दु. १.१८) ते चर्चगेट (दु. २.४४)
चर्चगेट (दु. २.५५) ते विरार (दु. ४.१२)
विरार (दु. ४.२२) ते चर्चगेट (सायं. ५.४२)
चर्चगेट (सायं. ५.४९) ते बोरिवली (सायं. ६.४१)
बोरिवली (सायं. ६.५५) ते चर्चगेट (सायं. ७.४४)
चर्चगेट (सायं. ७.४९) ते विरार (रा. ९.१५)
विरार (रा. ९.२५) ते चर्चगेट (रा. १०.४८)

Post Bottom Ad