१५ दिवसात अग्निसुरक्षेची व नियमांची पूर्तता न केल्यास कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2018

१५ दिवसात अग्निसुरक्षेची व नियमांची पूर्तता न केल्यास कारवाई


महापालिकेचा आस्थापनांना इशारा -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत कमला मिल परिसरात लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली आहे. या कारवाईदरम्यान पालिकेच्या नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे तसेच अग्निसुरक्षेची काळजी घेत जात नसल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे मुंबई महापालिकेने अग्निसुरक्षेची व नियमांची १५ दिवसात अंमलबजावणी करावी. याचबरोबर जे बांधकाम किंवा ज्या बाबी अनधिकृत असतील, त्या पुढील १५ दिवसात व स्वत:हून निष्कासित कराव्यात असे आवाहन केले आहे. अग्निसुरक्षेची व नियमांची अंमलबजावणी न केल्यास १५ दिवसांनंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे पालिकेने कळविले आहे.

कमला मिल दुर्घटनेनंतर दोन दिवसात पालिकेने १२४० आस्थापनांची पाहणी केली. नियमबाह्य काम केलेल्या ६७१ आस्थापनांवर तोडकी कारवाई करण्यात आली. ३७ आस्थापनांना सील ठोकण्यात आले आहे. तर तब्बल ८४३ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहे. मुंबईतील आस्थापनांमध्ये अनेक बेकायदेशीर बाबी घडत असल्याचे या कारवाई दरम्यान पालिकेच्या निदर्शनास आले आहे. यामुळे व्यवसायाच्या ठिकाणी आगप्रतिबंधक यंत्रणा नसली तर वीज-पाणी कापण्याचा इशारा दिल्यानंतर पालिकेने परवान्यासह ‘गॅस लिकेज डिटेक्टर’ बसवणेही बंधनकारक केले आहे. आगीच्या घटना टाळण्यासाठी व्यवसायिकांनी इलेक्ट्रिक वायिंरंग आणि वीजदाबाची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी असे निर्देशही पालिका प्रशासनाने दिले आहे. व्यवसायाच्या ठिकाणी आगप्रतिबंधक यंत्रणा असणे बंधनकारक करण्यात आले असून आग लागण्याची इतर कारणे टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. अन्नपदार्थ शिजवण्याच्या ठिकाणी तापमानात होणार्‍या वाढीच्या पार्श्वभूमीवर वायरिंग, बटने आणि विद्युत उपकरणांची योग्य काळजी घ्यावी असे निर्देश पालिकेने दिले आहेत. एलपीजी गॅस सिलिंडर अधिकृत विक्रेत्याकडून विकत घ्यावेत आणि त्यांची तज्ज्ञांकडून वेळोवेळी तपासणी करून घ्यावी, सिलिंडर आडवे ठेवू नयेत, सेफ्टी कॅप लावावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोळसा, लाकूड, रॉकेल, डिझेल किंवा गॅस यासारख्या इंधनांच्या वापरारसाठी परवान्यापेक्षा जास्त साठा आढळल्यास जप्ती आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. विद्युत भट्टीसाठीदेखील हा नियम लागू राहणार आहे. व्यवसायाच्या ठिकाणी परवान्यापेक्षा जास्त सिलिंडर आढळले तरी कारवाई करण्यात येणार आहे. आगीच्या घटना टाळण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शक सूचनाही पालिकेच्या www.mcgm.gov.in (portal.mcgm.gov.in) संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत.

पालिका अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार - 
मुंबईत गेले २ दिवस विविध आस्थापनांच्या परिसरातील नियमबाह्य बाबींविरोधात धडक कारवाई सुरु आहे. या आस्थापनांमध्ये ज्या नियमबाह्य अनियमितता आढळून आल्या आहेत, त्या दृष्टीने विभाग स्तरीय इमारत व कारखाने खात्यातील अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकारी तसेच मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी इत्यादींनी आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे का? व्यवसायिक तक्रारदारांबरोबर अधिकारी कर्मचा-यांचे संगनमत होते का? याबाबत सर्व ७ परिमंडळांच्या उपायुक्तांनी तपासणी करावी व अशा अधिका-यांची आणि व्यवसायिक तक्रारदारांची नावे महापालिका आयुक्तांना कळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Post Bottom Ad