Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

बेकायदा हॉटेल बांधकामांवर सोमवारपासून पुन्हा कारवाई - पालिका आयुक्त


मुंबई । प्रतिनिधी -
शहरातील ज्या हॉटेलमध्ये अग्निशमन यंत्रणेतील उणीवा आढळतील अशा हॉटेलांना नोटीसा न देता, महाराष्ट्र फायर सर्विसेस एक्ट अंतर्गत थेट सील ठोकण्यात येईल. सोमवारपासून मुंबईतील सर्व उपहारगृहांची झाडाझडती घेवून पुन्हा कारवाई करण्यात येईल. रस्ते व नालेसफाई घोटाळ्याप्रमाणेच ही देखील सफाई करुन दाखवणार, अशी ठाम भूमिका पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पालिका सभागृहात मांडली. कमला मिल आगीच्या दुर्घटनेनंतर गच्चीवरील हॉटेलबाबत हरकती घेऊन पॉलिसीला विरोध केला जात होता. मात्र, पालिका आयुक्तांनी रुफटॉप हॉटेल धोरणात काय चुकले? असा प्रश्न विचारात रुफटॉप हॉटेल धोरणाचे समर्थन केले.

कमला मिल दुर्घटनेप्रकरणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी निवेदन मांडून पालिकेच्या कामाकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी ही तीव्र संताप व्यक्त करुन प्रशासानाला धारेवर धरले. प्रशासनाकडून यावर खुलासा देताना, पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व प्रश्नांना उत्तरे देत, यापुढील कारवाईची भूमिका स्पष्ट केली. कमला मिल दुर्घटनेनंतर कारवाई करताना एका राजकीय नेत्याने मोठ्या आवाजात मला विचारले की, तुम्ही कशी काय कारवाई करता? पण ऐकणार सर्वांचे व करणार कायद्याचे हे माझे तत्व आहे. त्यामुळेच मी येथील 17 अनधिकृत बांधकामे तोडली. आणि यापुढे तोडत राहणार, असे सांगत त्या राजकीय नेत्याचे नाव सांगणार नाही, ते नाव विरोधी पक्षनेत्यांनी शोधावे, असा टोलाही रवी राजा यांना लगावला. कारवाई करताना मी मागे हटणारा नाही. येत्या 15 दिवसांत नियमबाह्य बांधकाम, अग्निसुरक्षेचे नियम पाळले नसतील त्यांच्यावर कारवाई करणार असून कोणालाही सोडणार नाही, अशी कठोर भूमिका त्यांनी मांडली.

अग्निसुरक्षा नियमांची पुर्तता केली की नाही, आणि निरंतर पाहणी करण्यासंदर्भात 34 अग्निसुरक्षा केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. या केंद्रामार्फत दोन दिवसात अग्निसुरक्षा कायदा अंमलबजावणी करण्यासंदर्भात पहाणी केली जाईल. अग्निसुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या आस्थापणा, हॉटेल तात्काळ बंद केली जातील. कोणतीही झोपडपट्टी असली तरी कारवाईचे अधिकार पालिकेला असून त्याची अंमलबजावणी केली जाईल. अग्निसुरक्षा केंद्राच्या कामकाजाला सोमवारपासून सुरुवात होणार असून हॉटेल, रेस्टोरंन्ट, आस्थापनामध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा नसल्यास थेट कारवाई करुन त्यांना सील ठोकले जाईल. यावेळी कोणतेही नोटीस दिली जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. आग दुर्घटनेनंतर पाच अधिकाऱ्यांना निंलबित करण्यात आले. याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यात दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई कठोर केली जाईल. कोणालाही क्लिनचीट दिली जाणार नाही. यापुढे हॉटेलांमध्ये निवासाला पूर्णतः मनाई केली आहे. तस आढळून आल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom