छात्र भारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

04 January 2018

छात्र भारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली

मुंबई । प्रतिनिधी - 
विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात होणाऱ्या छात्रभारती संघटनेच्या संमेलनात गुजरातमधील दलित समाजाचे नेते जिग्नेश मेवाणी आणि ‘जेएनयू’मधील आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेला विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद यांची भाषणे होणार होती. मात्र महाराष्ट्रातील गेले काही दिवस सुरु असलेल्या वातावरणाचे कारण देत पोलिसांनी ऐनवेळी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. यामुळे पोलीस आणि सरकारच्या दडपशाहीचा छात्रभारतीने निषेध नोंदवला. यावेळी पोलिसांकडून काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. तर उर्वरित विद्यार्थ्यांना परिसरातून हटवण्यात आले.

भीमा कोरेगाव दगडफेक प्रकरणानंतर राज्यात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याचे कारण पोलिसांनी दिले आहे. बुधवारी महाराष्ट्र बंदवेळी झालेल्या तोडफोडीनंतर त्यांच्या या वक्तव्याने आणखी तणाव निर्माण होऊ नये, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, आजचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होणारच अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण चिघळू नये म्हणून पोलिसांनी विद्यार्थ्यांना व छात्रभारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे यांना ताब्यात घेतले. भीमा कोरेगावाच्या हिंसाचाराला कारणीभूत असणाऱ्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना सोडून सरकार शांततेच्या मार्गाने होणारी विद्यार्थ्यांची सभा उधळून लावत आहे. विद्यार्थ्यांना उचलून तुरूंगात टाकत आहे. विद्यार्थ्यांना तुरूंगात टाकणारे हे सरकार नाकर्ते आहे, अशी टीका आमदार कपिल पाटील यांनी केली. दरम्यान पोलिसांनी आमदार कपिल पाटील यांनाही ताब्यात घेतले. सांयकाळी या सर्वाना पोलिसांनी सोडून दिले.

जनता दलाकडून निषेध - 
'छात्रभारती' संघटनेच्या गुरुवारी आयोजित कार्यक्रमावर जबरदस्तीने बंदी घालून पोलिसांकडून कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, साने गुरुजी, एस एम जोशी यांच्या विचारांवर चालणाऱ्या विद्यार्थी संघटनेचा कार्यक्रम सरकारने जबरदस्तीने होऊ दिला नाही. हा कार्यक्रम दोन महिने आधीच नियोजित करण्यात आला होता. दोन दिवसीय या कार्यक्रमाचे ठिकाणी व वक्ते जाहिर होते. मुख्य म्हणजे हा कार्यक्रम बंधिस्त हॉलमध्ये होणार होता. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राबाहेरुन देखील अनेक विद्यार्थी आले होते. या विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याचे सोडून पोलिसांनी कार्यकर्त्यांना जबरदस्तीने अटक केली. हि पद्धत म्हणजे हुक़ूमशाही राजवटीमधील आहे. सरकार हुकूमशाह असल्याप्रमाणे वागले आहे. विद्यार्थ्यांच्या आवजाची गळचेपी केल्याने जनता दल सेक्युलरच्या मुंबई महासचिव ज्योती बडेकर यांनी सरकारचा निषेध केला आहे.

Post Top Ad

test
test