डॉ. आंबेडकर रुग्णालयातील पूर्णाकृती पुतळा लालफितीत अडकला - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

28 January 2018

डॉ. आंबेडकर रुग्णालयातील पूर्णाकृती पुतळा लालफितीत अडकला


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात गेल्या साडे चार वर्षात बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास पालिका प्रशासनाला अपयश आले आहे. बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत राज्य सरकारने जानेवारी २०१६ ला मंजुरी दिली आहे. त्यानंतरही अद्याप त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. दरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि त्याकडे जाण्यासाठी डोम उभारण्यासाठी भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी पालिकेकडे परवानगी मागितली आहे. त्याला मंजुरी द्यावी असा प्रस्ताव पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. गटनेत्यांच्या मंजुरीनंतर इतरही समित्या व पालिका सभागृहाची मंजुरी बाकी असल्याने डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा कधी उभा राहणार असा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कांदिवली पश्चिम येथे मुंबई महानगरपालिकेचे ३२४ बेड्चे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका सर्वसाधारण रुग्णालय सप्टेंबर २०१३ मध्ये सुरु करण्यात आले. या रुग्णालयात ऑक्टोबर २०१३ पासून मोडकळीस आलेले भगवती रुग्णालय ऑक्टोबर २०१३ मध्ये विलीन करण्यात आले. सध्या डॉ. आंबेडकर रुगालयाची क्षमता ४२७ बेडची आहे. या रुग्णालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा म्हणून आरपीआयचे उपाध्यक्ष अर्जुन गुप्ता, आर दक्षिण विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष रामआशिष गुप्ता, स्वाभिमान सामाजिक सेवा संस्थेचे प्रेमसागर गुप्ता यांनी त्यावेळी पत्रव्यव्हारहार केला होता. त्याला अनुसरून पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत, पुतळा उभारणे व निधी उभारण्यासाठी जानेवारी २०१६ मध्ये राज्य सरकराने मंजुरी दिली आहे. तसेच पुतळा जास्तीत जास्त अडीच वर्षाच्या आत उभारण्यात यावा असे आदेश दिले होते. गेल्या दोन वर्षात पालिका प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही हालचाली करण्यात आलेल्या नव्हत्या.

फेब्रुवारी २०१७ ला महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली. यानंतर १४ सप्टेंबर २०१७ ला प्रभाग क्रमांक २२ च्या नगरसेविका प्रियांका मोरे यांनी स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार रुग्णालयात पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी महापौरांकडे केली आहे. तर , १६ ऑक्टोबर २०१७ ला आर दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष कमलेश यादव यांनी व १ नोव्हेंबर २०१७ ला भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी याबाबत महापौरांकडे पत्र लिहिले आहे. यात डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व ये जा करण्यासाठी डोम बनविण्याचा प्रस्ताव भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी पालिकेला सादर केला आहे. त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. गटनेत्यांच्या मंजुरीनंतर विधी समितीच्या मंजुरीसाठी सदर प्रस्ताव सादर करण्यात येईल. पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यासाठी स्थायी समिती व नंतर पालिका सभागृहाची मंजुरी घ्यावी लागणार आहे.

गटनेत्यांच्या बैठकीत खडाजंगीची शक्यता -
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णलयात भाजपा खासदारांच्या निधीमधून बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यास सत्ताधारी शिवसेना विरोध करण्याची शक्यता आहे. भाजपा खासदाराकडून निधी घेतल्यास याचे क्रेडिट भाजपा घेऊ शकते. यामुळे भाजपा खासदारांकडून निधी घेण्यापेक्षा पालिकेचा निधी वापरून पुतळा उभारण्याची मागणी शिवसेना व इतर पक्ष लावून धरू शकतात. यामुळे येत्या गटनेत्यांच्या बैठकीत या प्रस्तावावरुन खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

Post Top Ad

test
test