विरोधी पक्ष नेत्यांनी आयुक्तांचे आव्हान स्वीकारले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 January 2018

विरोधी पक्ष नेत्यांनी आयुक्तांचे आव्हान स्वीकारले


सत्य शोधन समिती नेमण्याची मागणी -
मुंबई । प्रतिनिधी -
कमला मिल परिसरातील दोन पबला लागलेल्या आगीनंतर पालिकेकडून बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली. बेकायदा बांधकामांवर कारवाई करू नये म्हणून माझ्यावर राजकीय नेत्यांकडून दबाव आला असा गौफ्यस्फोट महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केला. आयुक्तांवर दबाव आणणाऱ्या राजकीय नेत्यांची नावे जाहीर करण्याची मागणी पालिका सभागृहात करण्यात आली. मात्र दबाव टाकणाऱ्यांचे नाव जाहीर न करता आयुक्तांनी हे नाव विरोधी पक्ष नेत्यांनी शोधून काढावे असे आवाहन केले आहे. पालिका आयुक्तांचे आवाहन स्वीकारत विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सत्य शोधन समिती नेमण्याची मागणी केली आहे.

कमला मिल परिसरातील मोजोस आणि वन अबव्ह या दोन पबला २९ डिसेंबरला आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन दोषींविरोधात कारवाईचे तसेच बेकायदेशीर कामांवर हातोडा चालवायचे आदेश दिले. या प्रकरणी पालिका आयुक्तांनी ५ अधिकाऱ्यांना निलंबित केले तर सहाय्यक आयुक्तांची बदली केली. पालिका सभागृहात याबाबत विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्या निवेदनवाद्वारे चर्चा घडवून आणली. या चर्चेदरम्यान विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करू नये म्हणून माझ्यावर राजकीय दबाव टाकण्यात आल्याचे म्हटले आहे. आयुक्तांवर कोणी दबाव टाकला त्यांची नावे पालिका आयुक्तांनी जाहीर करावी अशी मागणी रवी राजा यांनी केली. तर भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनीही आयुक्तांवर दबाव आणणे चुकीचे आहे. आयुक्तांवर कोणी दबाव आणला असेल तर अश्या दबाव आणाऱ्यांची यादी आयुक्तांनी सभागृहात सादर करावी अशी मागणी कोटक यांनी केली. यावर बोलताना आयुक्तांनी त्या राजकीय नेत्याचे नाव मी सांगणार नाही. ते नाव विरोधी पक्षनेत्याने शोधावं असं म्हटलं होत.


दरम्यान पालिका आयुक्तांना वाटत असेल तर दबाव टाकणाऱ्या राजकीय नेत्याचं नाव मी शोधण्यास तयार आहे. दबाव टाकणाऱ्या राजकीय नेत्याचे नाव शोधण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती जाहीर करावी. त्यासाठी महापौरांच्या माध्यमातून त्यांनी माझे नाव जाहीर करावं. समिती जाहीर झाल्यावर मी चौकशी करेन. पालिका आयुक्तांवर दबाव आणला गेला असल्याने या चौकशीदरम्यान आयुक्तांनी मला पूर्ण सहकार्य करावं. कमला मिलमधील आगीच्या घटनेनंतर सुरु करण्यात आलेल्या तोडक कारवाई दरम्यान आयुक्तांना कोणाचे फोन आले, त्या फोन कॉल्सची माहिती त्यांनी मला उपलब्ध करून द्यावी. याशिवाय या कालावधीत आयुक्तांना कोण भेटायला आले याची माहिती उपलब्ध करून द्यावी, तसेच पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेरील सीसीटीव्हीचे फुटेज उपलब्ध करून द्यावे असे रवी राजा यांनी म्हटलं आहे.

Post Bottom Ad