Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पालिकेचा अर्थसंकल्प 10 टक्क्यांनी वाढणार ?


मुंबई । प्रतिनिधी -
जगातील श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प फुगीर आकडेवारीचा असल्याचा आरोप झाल्याने चालू वर्षाचा अर्थसंकल्प १२ हजार कोटी रुपयांनी कमी करत २५ हजार १४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. येत्या 2 फेब्रुवारीला २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. चालू वर्षाच्या तुलनेने या अर्थसंकल्पात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०१८-१९ साठी अंदाजे 28 हजार कोटीचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. अर्थसंकल्पात कफ परेड येथील सेंट्रल पार्कल, कोस्टलरोडसाठी भरीव तरतूद, क्रीडा संकुल, उद्याने, मैदाने तयार करणे, नवे तरण तलाव तयार करण्यावर भर देण्यात येईल. तसेच मुख्य जलवाहिन्यांच्या बाजूने सायकल ट्रॅक, भायखळा येथे पहिले भूमिगत वाहनतळ, नागरिकांच्या सुविधा आदींवर भर दिला जाणार आहे.

मुंबई पालिकेचा २०१७-१८ या वर्षाचा अर्थसंकल्प पूर्वीच्या अर्थसंकल्पापेक्षा तब्बल १२ हजार कोटींनी कमी करण्यात आला होता. म्हणजे ३७ हजार कोटींवरून २५ हजार कोटींवर आणण्यात आला. मात्र, आगामी अर्थसंकल्पात जवळपास 10 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होण्याची शक्‍यता आहे. सध्या पालिकेचे मोठे प्रकल्प सुरू असल्याने या वर्षात मोठे नवे प्रकल्प हाती घेतले जाणार नसून जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर अधिक भर देण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याचे सांगण्यात येते. दोन ठिकाणी भूमिगत वाहनतळ उभारण्याच्या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद होण्याची शक्‍यता आहे. तसेच गोवंडीतील शताब्दी, मुलुंडमधील अगरवाल आणि घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयाच्या विस्तारावर भर देण्यात येईल. नाहूर येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. पश्चिम उपनगरासोबत पूर्व उपनगरात क्रीडा संकुल, उद्याने, मैदाने तयार करणे, नवे तरण तलाव तयार केले जाईल. तसेच मुख्य जलवाहिन्यांच्या बाजूने सायकल ट्रॅक उभारण्यासाठी सुमारे साडेतीनशे कोटींची तरतूद होण्याची शक्‍यता आहे. भायखळा येथे पहिले भूमिगत वाहनतळ उभारण्याबरोबर अन्य वर्दळीच्या ठिकाणी दुसरे वाहनतळही बांधण्याचा पालिकेचा विचार असून त्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. तसेच महत्वाकांक्षी मानल्या जाणा-य़ा नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या कोस्टल रोडसाठी अर्थसंकल्पात एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, त्यातील १० ते १५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक खर्च झाला नाही. आगामी वर्षाच्या बजेटमध्ये कोस्टल रोडसाठी सुमारे दोन हजार कोटींची तरतूद होण्याची शक्‍यता आहे. मुंबईचा २०१४ ते २०३४ या २० वर्षांचा विकास आराखडा मार्च अखेर मंजूर होण्याची शक्‍यता आहे. आराखड्यातील तरतुदीनुसार नवी उद्याने, मैदाने ताब्यात घेणे, रस्ते रुंदीकरण तसेच इतर आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठी आगामी वर्षात भरीव तरतूद केली जाण्याची शक्‍यता आहे. मुलुंड क्षेपणभूमी बंद करून देवनार क्षेपणभूमीवर कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यावर मुंबई महापालिकेकडून भर देण्यात येणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom