Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राणीबागेतील उद्यान प्रदर्शनाला १ लाख २५ हजार मुंबईकरांनी दिली भेट


मुंबई । प्रतिनिधी -
भायखळा येथे असलेल्या महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात म्हणजेच राणीच्या बागेत ९ फेब्रुवारीपासून तीन दिवसीय वार्षिक उद्यान प्रदर्शन सुरु आहे. आज प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी नागरिकांच्या उत्साहाने उच्चांक गाठत सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० हजार मुंबईकर नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे, अशी माहिती उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ३५ हजार, तर दुसऱ्या दिवशी सुमारे ४० हजार नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती. तर प्रदर्शनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी ४ वाजेपर्यंत सुमारे ५० हजार, याप्रमाणे आतापर्यंत १ लाख २५ हजार नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे, असे परदेशी यांनी सांगितले.

गेल्यावर्षीपासून एक विषय घेऊन त्यावर आधारित पुष्परचना, वृक्षरचना या प्रदर्शनात विशेषत्वाने प्रदर्शित करण्यात येत आहेत. या वर्षी जलप्रदुषणाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने कृत्रिम नदी तयार करण्यात आली असून पानाफुलांपासून तयार करण्यात आलेली लहानग्यांची आवडती जलपरी आणि शिकारा (काश्मिरी पद्धतीची नाव) देखील या नदीमध्ये आहे. यासोबतच डॉल्फिन, स्टारफिश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा, ऍनाकोंडा यासारख्या जलचरांच्या वा इतर प्रकारातील प्राण्यांच्या प्रतिकृती या प्रदर्शनात आहेत. या प्रदर्शनाला सुमारे १ लाख २५ हजार नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि नाट्य-चित्रपट संबंधी क्षेत्रातील कलावंतांनी देखील भेट देऊन येथील कलाकृतींचे कौतुक केले. यामध्ये प्रामुख्याने ऋषी कपूर, फरहान अख्तर, रमेश भाटकर, मनीष पॉल, नीता शेट्टी, कमलाकर सातपुते, अन्नू कपूर, वर्षा उसगावकर, मृणालिनी जांभळे, सुनील पाल, वैशाली सामंत इत्यादींचा समावेश होता. गेल्यावर्षी आयोजित प्रदर्शनालाही १ लाख २५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली होती. गेल्यावर्षीच्या प्रदर्शनात फुलांपासून तयार करण्यात आलेले मिकी माऊस, डोनाल्ड डक, डोरेमॉन इत्यादी 'कार्टुन कॅरेक्टर' लहानग्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू, तर मोठ्यांच्या स्मरणरंजनाचा (Nostalgia) विषय ठरले होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom