Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माजी विश्वस्तांवर गुन्हा दाखल करा - भ्रष्टाचारविरोधी कृती समिती


मुंबई -- भाविकांनी श्रध्देने अर्पण केलेल्या धनाचा श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माजी विश्वस्तांकडून अपहार झाल्याचा आरोप भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने केला आहे. संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून देवनिधी वसूल करा अशी मागणी कृती समितीने केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत समितीने हा आरोप केला.

प्रभादेवी येथील सिध्दिविनायक मंदिरात दशर्नासाठी देशभरातून लोक श्रध्देने येतात. सन 2016 मध्ये मंदिराच्या न्यासाच्या करण्यात आलेल्य़ा तपासणीत काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यांमध्ये 1 जानेवारी 2015 ते 31ऑगस्ट 2016 या कालावधीत या न्य़ासाच्या विश्वस्तांनी जलयुक्त शिवार आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याच्या देणग्या संदर्भातील अभ्यास दौ-याच्या नावाखाली 8 लाख 11 हजार 291 रुपये इतका खर्च केला आहे. यामध्ये लॉजिंग खानपान आदी खर्चाचा समावेश आहे. श्री सिध्दीविनायक मंदिर कायदा विश्वस्तांना अशा प्रवास खर्चाचीस अनुमतीच देत नाही, त्यासाठी शासनाची अनुमती घ्यावी लागते. त्यामुळे विना अनुमती अभ्यास दौ-यावर मंदिर विश्वस्तांनी केलेला खर्च नियमबाह्य आहे, असे कृती समितीने म्हटले आहे. जलयुक्त शिवाराचे पैसे राज्य शासनालाच दिले आहेत., तर दौरा करायची गरजच काय होती? असा सवाल विचारीत हे प्रकरण गंभीर असून संबंधित विश्वस्तांवर फसवणूक आणि अफरातफर यांचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी श्री सिध्दिविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचार विरोधी कृती समितीचे कायदेशीर सल्लागार, तथा विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केली आहे. मंदिराच्या माजी विश्वस्तांनी मंदिराच्या देवनिधीत केलेल्या अपहाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी गणेश भक्तांच्यावतीने ही समिती स्थापन करण्यात आली असल्याचे इचलकरंजीकर यांनी स्पष्ट केले. यावेळी कृती समितीचे समन्वयक अजय संभूस, सदस्य डॅा. अमित थ़डाणी, बजरंग दलाचे शिवकुमार पांडे, शंभू गवारे उपस्थित होते.

सन 2015 मध्ये तत्कालीन न्यासाच्या एका विश्वस्ताने 27 ते 29 जानेवारी असे तीन दिवस मिरज (सांगली) येथील सिध्दिविनायक कर्करोग रुग्णालयाला भेट देण्यासाठी दौरा केला. मात्र प्रत्यक्षात त्यांनी दौ-याचे दिलेले एक देयक गोवा राज्यातील एका हॉटेलचे आहे. मुंबई ते मिरज या प्रवासात गोवा येते का? शिवाय अभ्यास दौ-याच्या नावाखाली ते गोव्यात मौजमजा करण्यासाठी गेले होते का? असा प्रश्नही समितीने उपस्थित केला आहे. दुस-या एका सदस्याने याच कालावधीत भाड्याने गाडी करुन मुंबई ते मिरज असा दौरा विनाअनुमती केला, असा आरोप कृती समितीच्या इचलकरंजीकर यांनी केला आहे. याशिवाय 2 ते 4 डिसेंबर 2013 या कालावधीत तत्कालीन सर्व विश्वस्तांनी तिरुपती देवस्थानची पाहाणी करण्यासाठी विमानाने दौरा केला. अन्य मार्गाऎवजी विमानाने खर्चिक प्रवास करुन विश्वस्तांनी मंदिराच्या पैशांची उधळपट्टी का केली, त्यासाठी शासनाची अनुमती का घेतली नाही. देवनिधीचा हा अपहार सर्व माजी विश्वस्तांकडून वसूल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शासनाने या भ्रष्टाचा-यांवर कारवाई करावी व देवनिधी वसूल करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा समितीचे समन्वयक अजय़ संभूस यांनी यावेळी दिला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom