Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारातून बोनसची रक्कम कापली जाणार


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईची लाईफलाईन असलेली बेस्ट आर्थिक संकटात आहे. बेस्टला आर्थिक मदत करावी म्हणून महापालिकेकडून अपेक्षेने पाहिले जात आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना बॉन मिळावा म्हणून महापालिकेने आर्थिक मदत केली होती. बेस्टने आपल्या कारभारात सुधारणा केल्यास ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या कापली जाणार नाही असे सांगण्यात आले होते. मात्र आता ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा कापली जाणार आहे. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

बेस्ट उपक्रमाला २१०० कोटी रुपयांचा संचित तोटा आहे. बेस्टने सन २०१७ - १८ चा ५६० कोटी रुपये तुटीचा तर सन २०१८- १९ चा ८८० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. बेस्टला आर्थिक मदत करावी म्हणून मुंबई महानगरपालिकेकडे अनुदान मागितले जात आहे. बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. दरम्यान दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात यावा अशी मागणी केसात आली होती. त्यासाठी संपाचा इशाराही देण्यात आला होता. यांनंतर पालिकेने बेस्टला २५ कोटी रुपये दिले होते. यामधून अधिकारी आणि कर्मचारयांना कशाप्रकारे बोनस वाटप करायचा हे बेस्टवर सोपवण्यात आले होते. पालिकेने २५ कोटी रुपये दिल्याने बेस्टच्या ४५ हजार कर्मचारी अधिकाऱ्यांना दिवाळीदरम्यान दिलासा मिळाला होता. पालिकेने दिलेल्या रक्कमेमधून बेस्ट कर्मचाऱ्यांना ५ हजार ५०० रुपये बोनस वाटप करण्यात आलं होता. बेस्टला बोनससाठी मदत करताना बेस्टने काही सुधारणा कराव्यात असे सुचवण्यात आले होते. पालिका आयुक्तांनी सुचवलेल्या सुधारणा बेस्टने अमलात आणल्यास बोनससाठी देण्यात आलेली रक्कम अनुदान म्हणून वर्ग करण्यात येईल असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर पालिका आयुक्तांनी बेस्टने सुधारणा केल्याचे दिसण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारामधून बोनससाठी देण्यात आलेली रक्कम दरमहा कापण्याची माहिती स्थायी समितीला दिली होती. स्थायी समितीमध्ये आयुमतानी दिलेल्या माहितीबाबत कोणत्याही राजकीय पक्षाने विरोध केला नव्हता. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारामधून बोनसची रक्कम कापली जाणार हे स्पष्ट झाले होते. आयुक्तांच्या निर्णयाला एक महिन्याची स्थगिती देण्यात आली होती. एका महिन्याचा कालावधी संपल्याने येत्या महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या पगारामधून दरमहा ५०० रुपये कापले जाणार आहेत. बोनसची रक्कम आधी कापणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आता बोनसची दिलेली रक्कम कापली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

आयुक्तांची दुहेरी भूमिका - 
आयुक्तांनी आधी बोनसची रक्कम पगारातून कापणार नाही असं म्हटलं होत. आता बोनसची रक्कम पगारामधून कापली जात आहे. बेस्टबाबत आयुक्त नेहमी दुहेरी भूमिका घेतात. आयुक्तांनी घेतलेली ही दुहेरी भूमिका आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारामधून बोनसची रक्कम कापली जाऊ नये म्हणून आयुक्तांची लवकरच भेट घेऊ. 
- अनिल कोळीळ, अध्यक्ष - बेस्ट समिती

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom