महापालिकेच्या सर्व रुग्णालयात सीसीटीव्ही लावण्याची मागणी


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत अशी मागणी शिवसेनेच नगरसेवक अनिल पाटणकर यांनी पालिका सभागृहात हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली आहे.

महापालिकेच्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात बुधवारी रात्री एका महिला रुग्णाच्या नातेवाईकाने एक्सरे तज्ञ् रमेश पवार यांना क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे पुन्हा एकदा रुग्णालये, प्रसूतिगृह येथील डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांच्यावर रुग्णांच्या नातेवाईकांकडून हल्ले होण्याच्या घटना घडत असून रुग्णालयीन सुरक्षिततेबाबतचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, असे अनिल पाटणकर यांनी पालिका सभागृहात सांगितले. गेल्या दहा महिन्यात शताब्दी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून हल्ले होण्याची ही दुसरी घटना घडली आहे. महिला रुग्णाच्या नातेवाईकाने सुरक्षा रक्षक व एक्सरे विभागातील रमेश पवार या कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यामुळे रुग्णालयीन सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली असल्याचे पाटणकर यांनी म्हटले आहे. रुग्णांना डॉक्टर, नर्स कष्ट घेऊन जीवनदान देतात, त्यांच्यावरच रुग्णांच्या नातेवाईकांकडून वारंवार हल्ले होण्याचे प्रकार चुकीचे आहेत. शताब्दी रुग्णालयात सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे कमी आहेत तर माता रमाबाई रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत, अशी तक्रार करत पालिकेच्या सर्वच रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, अशी मागणी पाटणकर यांनी केली आहे.
Tags