जूनपासून कामाला सुरुवात -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या ब्रिटीश कालीन जुन्या 274 पुलांचे (स्कायवॉक सोडून ) स्ट्रक्चरल ऑडिट अहवालाचे काम अंतीम टप्प्यात आहे. हा अहवाल मार्च अखेरपर्यंत सादर केला जाणार आहे. या अहवालानंतर किती पुल चांगल्या स्थितीत आहेत, किती पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे व किती पुल पाडून नवीन उभारले जाणार हे ठरवले जाईल व त्यानंतर जूनपासून कामाला सुरुवात केली जाणार आहे. मुंबईतील पालिकेच्या अखत्यारितील जुने जिर्ण झालेले तसेच ब्रिटीश कालीन पुलांचे मागील अनेक वर्षापासून स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. यातील ब्रिटिशकालिन पूल कोणते याची माहितीही पालिकेकडे नव्हती. बहुतांशी पूल हे ब्रिटीशकालीन असून त्याची वयोमर्यादा संपली असतानाही वाहतूक सुरु आहे. एखादी दुर्घटना या पुलासंदर्भात घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी मुंबई महापालिकेची राहणार आहे. त्यामुळे या पुलांची तातडीने दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करण्याच्यादृष्टीने प्रशासनाने धोरण ठरवावे असे पत्र तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्तांना पाठवले होते. त्यानंतर पालिकेने धावपळ करीत या पुलांचे सर्व्हेक्षण करून ऑडिट करण्याचा निर्ण घेतला. दोन वर्षाच्या कालावधीनंतर पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम अंतीम टप्प्यात आले आहे.
मुंबईत पालिकेच्या अखत्यारित 274 पुल आहेत. यातील काही पुल जिर्ण अवस्थेत आहेत. पालिकेने या सर्व पुलांची यादी तयार करून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची प्रक्रिया सुरू केली. यासाठी तिन्हीही विभागातील पुलांसाठी तीन कन्सलटन्ट कंपन्या नियुक्त्या केल्या. किती पूल जुने आहेत, आतापर्यंत कितीवेळा डागडुजी झाली, पुलांचे आयुर्मान आदी तपासणी करण्यात आली. दरम्यान आता यातील ब्रिटिशकालिन पूल किती याची माहितीही पालिकेकडे उपलब्ध झाली आहे. तपासणीच्या पहिल्या टप्प्यात सर्व पुलांचा आढावा घेण्यात आला. यांत कोणता पूल पाडणे आवश्यक आहे. कोणता नवीन पूल बांधावा लागेल. शिवाय डागडूजी कोणत्या पुलाची करावी लागणार हे ऑडिट अहवालानुसार निर्णय़ घेतला जाणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल आता अंतीम टप्प्यात असून तो लवकरच सादर केला जाणार असल्याने जुन्या, जीर्ण झालेल्या पुलांच्या दुरुस्ती, बांधकामाचा मार्ग आता मोकऴा होणार आहे.