भाजपाचा सामना करण्यासाठी पालिकेत शिवसेनेकडून फेरबदल - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

16 February 2018

भाजपाचा सामना करण्यासाठी पालिकेत शिवसेनेकडून फेरबदल


सातमकर, चेंबूरकर यांच्या जागी वैद्य, कदम यांची नियुक्ती -
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने आक्रमक पावित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरात भाजपाचे पालिकेत वाढलेले वर्चस्व कमी करण्यासाठी शिवसेनेने आपले अभ्यासू व जेष्ठ नगरसेवकांना समिती अध्यक्ष बनवून पालिका प्रशासनावर आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. पालिका प्रशासनावर आपली पकड घट्ट करून शिवसेनेच्या वचननाम्याची अंमलबजावणी करून येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूका जिंकण्याची रणनिती बनवण्यात आली आहे. त्याचाच एका भाग म्हणून शिवसेनेचे जेष्ठ सदस्य असलेले नगरसेवक मंगेश सातमकर व आशिष चेंबूरकर यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. सातमकर आणि चेंबूरकर यांच्या जागी माजी महापौर मिलिंद वैद्य व मनसेतून शिवसेनेनेत आलेले नगरसेवक परमेश्वर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी सामितीत सदस्य असलेले मंगेश सातमकर व आशिष चेंबूरकर यांचा राजिनामा घेण्यात आला आहे. या दोघांचा राजीनामा घेतल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आले होते. सातमकर आणि चेंबूरकर यांच्या जागी मनसेमधून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांची वर्णी लावता यावी म्हणून राजीनामे घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आज पालिका सभागृहात सातमकर आणि चेंबूरकर यांच्या जागी मुंबईचे माजी महापौर मिलिंद वैद्य व मनसेतून शिवसेनेत आलेले घाटकोपर कामराज नगर येथील नगरसेवक परमेश्वर कदम यांची नियुक्ती करण्यात आल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केले. तसे पत्र पालिका सभागृह नेते यशवंत जाधव यांनी महापौरांना दिले होते. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. पालिकेच्या अनेक समित्यांच्या अध्यक्षपदी शिवसेनेकडून नवीन सदस्यांना संधी देण्यात आली. अनेक अध्यक्ष नवीन असल्याने पालिकेच्या कारभारावर शिवसेनेचा वचक कमी होऊ लागला होता. आपली सत्ता केंद्रात आणि राज्यात असल्याचा फायदा उचलत गेल्या वर्षभराच्या काळात भाजपाने पालिका प्रशासनावर आपली पकड निर्माण केली होती. पुढील वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूका आहेत. त्यामुळे मुंबई महत्वाची असल्याने शिवसेनेने आपला वाचक निर्माण करण्यास सुरवात केली आहे. सातमकर आणि चेंबूरकर यांचे राजीनामे घेऊन सातमकर यांना शिक्षण समिती अध्यक्ष, आशिष चेंबूरकर यांना बेस्ट समिती अध्यक्ष बनवले जाणार आहे. शिवसेनेच्या जेष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनाही सुधार समितीमधून स्थापत्य समिती शहरच्या सदस्य बनवण्यात आले आहे. स्थापत्य समिती शहरच्या अध्यक्षपदी किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती केली जाणार आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी माजी महापौर मिलिंद वैद्य यांची नियुक्ती केली जाईल किंवा हे पद सभागृह नेते यशवंत जाधव स्वतःकडे ठेवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर मनसेमधून शिवसेनेत आलेले दिलीप लांडे यांची सुधार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

Post Top Ad

test