ब्रिटिशकालीन 274 जुन्या, धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर

JPN NEWS

पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट रखडले -
मुंबई । प्रतिनिधी -
महाड येथील पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील जुन्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. पालिकेने मुंबई महापालिका जुन्या ब्रिटीशकालीन 274 पुलांचे सर्वेक्षण करून स्ट्रक्चल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. मागील दोन वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. या अहवालानुसार या पुलांची दुरुस्ती, धोकादायक असेल तर पूल पाडून पुन्हा बांधकाम करण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र मागील दोन वर्षापासून स्ट्रक्चरल ऑडिटची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने जुन्या, धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऑडिटचे काम जवळपास पूर्ण झाले असून अहवाल मार्च अखेरपर्यंत सादर केला जाईल असे संबंधित अधिकाऱयांकडून सांगण्यात आले होते. मात्र ही अपेक्षा धूसर झाली आहे. अहवाल सादर झाल्या शिवाय दुरुस्तीचे काम हाती घेता येणार नाही. त्यामुळे दुरुस्तीचे काम अजून रखडण्याची शक्यता आहे.

मुंबईतील पालिकेच्या अखत्यारितील जुने जिर्ण झालेले तसेच ब्रिटीश कालीन पुलांचे मागील अनेक वर्षापासून स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. यातील ब्रिटिशकालिन पूल कोणते याची माहितीही पालिकेकडे नव्हती. बहुतांशी पूल हे ब्रिटीशकालीन असून त्याची वयोमर्यादा संपली असतानाही वाहतूक सुरु आहे. एखादी दुर्घटना या पुलासंदर्भात घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी मुंबई महापालिकेची राहणार आहे. त्यामुळे या पुलांची तातडीने दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करण्याच्यादृष्टीने प्रशासनाने धोरण ठरवावे असे पत्र तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्तांना पाठवले होते. त्यानंतर पालिकेने धावपळ करीत या पुलांचे सर्व्हेक्षण करून ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत पालिकेच्या अखत्यारित 274 पुल आहेत. यातील काही पुल जिर्ण अवस्थेत आहेत. पालिकेने या सर्व पुलांची यादी तयार करून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची प्रक्रिया सुरू केली. यासाठी तिन्हीही विभागातील पुलांसाठी तीन कन्सलटन्ट कंपन्या नियुक्त्या केल्या. किती पूल जुने आहेत, आतापर्यंत कितीवेळा डागडुजी झाली, पुलांचे आयुर्मान आदी तपासणी करण्यात आली. दरम्यान आता यातील ब्रिटिशकालिन पूल किती याची माहितीही पालिकेकडे उपलब्ध झाली आहे. तपासणीच्या पहिल्या टप्प्यात सर्व पुलांचा आढावा घेण्यात आला. यांत कोणता पूल पाडणे आवश्यक आहे. कोणता नवीन पूल बांधावा लागेल. शिवाय डागडूजी कोणत्या पुलाची करावी लागणार हे ऑडिट अहवालानुसारच निर्णय़ घेतला जाणार आहे. त्यामुळे अहवाल सादर करण्यास इतका उशीर का हा प्रश्न आता विचारला जातो आहे.

जूननंतर कामाला सुरुवात - 
मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या 274 पुलांचे (स्कायवॉक सोडून ) स्ट्रक्चरल ऑडिट अहवालाचे काम अंतीम टप्प्यात आहे. येत्या जूननंतर कामाला सुरुवात केली जाणार आहे. किती चांगल्या स्थितीत पुल आहेत, किती पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे व किती पुल पाडून नवीन उभारले जाणार हे ठरवले जाईल व त्यानंतर कामाला सुरुवात केली जाणार आहे. 
- शितला प्रसाद कोरी, मुख्य अभियंता (पूल विभाग)
Tags