Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पालिका अभियंत्यांचे "नो एक्स्ट्रा वर्क" आंदोलन सुरु


दुर्लक्ष झाल्यास संपावर जाण्याचा इशारा -
मुंबई । प्रतिनिधी - प्रशासनाकडून अभियंत्यांच्या कार्यालयीन वेळा निश्चित करण्याबाबत होणाऱ्या अक्षम्य दिरंगाईमुळे अभियंत्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यातच बायोमॅट्रिक प्रणालीच्या गोंधळामुळे वेतन कपातीची भर पडली आहे. या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून महापालिकेचे अभियंत्यांनी सोमवारपासून कार्यालयीन वेळेत आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे फक्त कार्यालयीन वेळेतच काम केले जाईल. प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास १६ मार्चपासून कामबंद आंदोलन केले जाईल. अभियंत्यांच्या या आंदोलनात पालिकेतील इतर विभागातील कर्मचारीही सहभागी होतील असा इशारा बृहन्मुंबई महापालिका अभियंता कृती समितीचे अध्यक्ष अॅड सुखदेव काशिद यांनी दिला आहे.

ब्रिटीशांच्या काळापासूनचा अडीच तासाचा सक्तीचा लंच टाईम बंद करून अभियंत्यांच्या कामाच्या वेळा निश्चित करणे, बायोमेट्रिक प्रणालीत सुधारणा आदी मागण्यांसाठी पालिकेतील अभियंत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारपासून "नो एक्स्ट्रा वर्क" आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आठ तासाचे वेळापत्रक लागू होत नाही तोर्यंत केवळ कार्यालयीन वेळेतच काम करण्याचा इशारा अभियंत्यांच्या दोन्ही संघटनांनी दिला आहे. पालिकेच्या बहुतांशी विभागात गेल्या अनेक वर्षांपासून दुपारी १२ ते अडीच पर्यंत लंच टाईम दिला जातो. मात्र आजच्या काळात ही पद्धत योग्य नाही. ही पद्धत बंद करून सलग आठ तासाची ड्युटी लावावी अशी अभियंत्यांची मागणी आहे. या मागणीसाठी म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन आणि बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियन या दोन्ही संघटनांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाणार आहे. आठ तासाची ड्युटी होत नाही तोपर्यंत अभियंत्यांनी कार्यालयीन वेळेतच काम करावे आणि पूर्ण लंच टाईम वापरावा असेही आवाहन संघटनेने केले आहे. आताच्या काळात अडीच तासाचा लंच टाईमची पद्धत योग्य नाही. अनेक अभियंते हे उपनगरातून, ठाणे जिल्ह्यातून येतात. त्यामुळे त्यांचे ड्युटीचे १२ ते १४ तास होतात. आतापर्यंत अभियंते लंच टाईम पूर्ण न घेता कामावर रुजू होत होते. मात्र बायोमेट्रीकमुळे त्यांना वेळ पूर्ण होईपर्यत थांबावे लागते. किमान फिल्डवरील अभियंत्यांना तरी बायोमेट्रीक लावू नये, अशी मागणी युनियनची आहे. सोमवार पासून कार्यालयीन वेळेत आंदोलन केले जाईल. या दरम्यान 15 मार्चला युनियनची याबाबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यास या बैठकीत व्यापक संपावर जाण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती काशीद यांनी दिली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom