डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे "भगवीकरण" - आंबेडकरी अनुयायांमध्ये संताप

उत्तर प्रदेश / बदाऊन - सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत दिलेल्या निकालामुळे देशभरात दलितांमधून संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यातच उत्तर प्रदेश सरकारने डॉ. आंबेडकर यांचा भगव्या रंगाचा एक पुतळा बसवला आहे. या पुतळ्याच्या भगव्या रंगावरून वातावरण आता आणखी तापू लागले आहे. बाबासाहेबांचा पुतळा भगव्या रंगाच्या शेरवानीत असल्याने भाजपाप्रणित योगी सरकारच्या या 'भगवीकरणा'वर स्थानिक आंबेडकरी संघटना आणि अनुयायांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमीच सुटामध्ये असायचे. त्यामुळे त्यांचे बहुतके पुतळे व फोटो सुटामधील आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशभरात आंबेडकरी वस्त्यांमध्ये हजारो पुतळे बसवण्यात आले आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेशच्या दुगरय्या येथे असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यांची दोन दिवसापूर्वी समाजकंटकांनी विटंबना केली होती. त्यानंतर आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. उत्तर प्रदेश सरकारने या जागी बाबासाहेबांचा नवा पुतळा बसवला आहे. या पुतळ्यात बाबासाहेब आंबेडकर शेरवाणीत असून पुतळ्याचा रंग भगवा करण्यात आला आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा रंग पाहून स्थानिक आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले आहेत. पुतळ्याच्या रंगावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. पुतळ्याच्या शेरवानीचा भगवा रंग अनेकांना खटकत आहे. त्यामुळे हा पुतळा पुन्हा रंगवण्यात यावा, अशी मागणी आरक्षण बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी भारत सिंग जाटव यांनी केली आहे. अॅट्रॉसिटी कायद्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालावरून आधीच आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले आहेत. मागील आठवड्यात उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने डॉ. भीमराव आंबेडकर या नावात त्यांच्या वडिलांच्या नावाचा समावेश करून डॉ. भीमराव रामजी आंबेडकर नाव लिहिण्याची सक्ती केली आहे. आता सरकारने बाबासाहेबांचा पुतळा भगवा केल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये सरकारविरोधी वातावरण निर्माण झाले आहे.
Previous Post Next Post