समता प्रस्थापित करण्यासाठी समाजिक न्याय विभाग कटीबध्द - राजकुमार बडोले


नागपूर (प्रतिनिधी) - शोषित, वंचित, पिडीत घटकांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करून समाजात समता प्रस्तापित करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटीबध्द असून यासाठी अनेक अभिनव योजना शासनाने सुरू केल्या आहेत. या सर्व योजना सामान्यजनांपर्यंत पोहचवण्याचे कार्य पुरस्कार्थींनी करावे, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केले.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह दिक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार तसेच संत रविदास पुरस्काराचे वितरण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते तर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या प्रमुख
उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बडोले बोलेत होते.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या विकासासाठी आमच्या विभागाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. प्रत्येत तालुक्याच्या ठिकाणी ५० मुलींसाठी तसेच नागपूर, मुंबई पुणे येथे नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह सुरू केले. बाबासाहेबांनी समाजातील युवकांना उच्च शिक्षणाद्वारे अधिकारी बनण्याच्या आवाहनाला अनुसरून आम्ही युपीएससी, एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण सुरू केले. यातून गेल्यावर्षी ५० तर यावर्षी १७ विद्यार्थी आयएएस झाले ही मोठी उपलब्धी आहे. विदेशात उच्च शिक्षणासाठी आम्ही ५० विद्यार्थ्यांना पाठवत होतो, आता ७५ मुलांना पाठवण्याचा निर्णय घेतला, असे बडोले म्हणाले. भुमीहीनांना शेतजमिन विकत घेता यावी, यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या रकमेत वाढ करून ती दोन एकर बागायतीसाठी १६ लाख तर चार एकर कोरडवाहूसाठी २० रूपये इतकी वाढ करून १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला. कौशल्य विकासाचे उपक्रम, नाविन्यपूर्ण औद्योगिक सहकारी योजना, बौध्द विवाह कायदा, आंतरजातीय विवाह कायदा असे अनेक उपक्रम राबवण्यात येत असून येत्या काळात मागासवर्गीय घटकांचा योग्य विकास होईल, असा विश्वास बडोले यांनी व्यक्त केला.

यावेळी अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती, शारिरीक व मानसिकदृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी अशा वंचित घटकांसाठी मौलिक कार्य करणाऱ्या 62 सामाजिक कार्यकर्त्यांना तसेच 6 संस्थांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात
आले.

पुरस्कारासाठी निवड झालेल्या कार्यकर्त्यांना 15 हजार रूपयांचा धनादेश, मानपत्र, सन्मानचिन्ह तसेच शाल-श्रीफळ तर संस्थांना प्रत्येकी 25 हजार रूपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.. तसेच पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कारासाठी एक व्यक्ती व एका संस्थेची तसेच संत रविदास पुरस्कारासाठी 4 व्यक्ती व एका संस्थेची निवड झाली. प्रत्येक पुरस्कर्थी व्यक्तीला 21 हजार रूपयांचा तर संस्थेला 30 हजार रूपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी नागपूरच्या प्रथम नागरिक नदांताई जिचकार, केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्या सुलेखाताई कुंभारे, अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सी. एल. थुल, खा. कृपाल तुमाने, आमदार भाई गिरकर, डॉ. मिलींद माने, गिरीष व्यास, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सुभाष पारधी, विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त मिलींद शंभरकर, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सी. एल. थुल, भाई गिरकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे,
महापौर नंदाताई जिचकार आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.