कारागृहातील गुन्हे रोखण्यासाठी 'सिक्रेट सर्व्हिस फंड'ची तरतूद - गृह राज्यमंत्री

JPN NEWS

नागपूर - राज्यातील कारागृहातील गुन्हे रोखण्यासाठी 'सिक्रेट सर्व्हिस फंड' ची तरतूद केल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कारागृहातील गुन्हे रोखण्यासाठी 'सिक्रेट सर्व्हिस फंड' निधीची तरतूद केल्याबाबतचा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले, सन 2018-19 साठी 5 लाखाचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून त्यापैकी 85 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. कारागृहात निषिद्ध वस्तू नेत असल्याबद्दल किंवा कुणी कैदी वापरत असल्याबद्दल माहिती मिळविण्यासाठी, कैद्यांचे पलायन, घातपात, कटाची माहिती मिळविणे, फरार झालेल्या कैद्यांची माहिती मिळविणे, कारागृहाची सुरक्षा, गुप्त हालचालींची माहिती, कैद्यांवर होणाऱ्या संभाव्य हल्ल्याची गुप्त माहिती मिळविण्यासाठी या 'सिक्रेट सर्व्हिस फंड'चा वापर करण्यात येतो,असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.