Type Here to Get Search Results !

कॉलड्रॉपबाबत सक्तीचे धोरण


नवी दिल्ली - मोबाईलवर होणाऱ्या कॉलड्रॉपबाबत आता सरकारने अतिशय कठोर धोरण अवलंबण्याचे ठरवले असून त्यामुळे फोन चालू असताना अचानक फोन कट होणे किंवा मध्ये मध्ये आवाज अडकून कॉलचा अनुभव घ्यावा लागणे, अशा प्रकारांना आळा घातला जाणार आहे. या संबंधातील असणारे नियम व निकष बदलण्यामुळे आता कॉलड्रॉपची परिभाषाही बदलली गेली आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून नवीन निकषांनुसार मोबाईल ऑपरेटर कंपन्यांना सुविधा द्याव्या लागणार आहेत. जर त्यांनी त्या सुविधा दिल्या नाहीत, तर त्यांना मोठा दंडही भरावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कॉलड्रॉप याबाबत बरेच वादंग झाले होते. त्यावर राजकारणानेही गती घेतली होती, त्यामुळे त्या स्थितीत सुधारणा होण्याच्या दिशेने सरकारने आता पावले टाकली आहेत.

कॉलड्रॉपची परिभाषा करताना ट्रायने सांगितले होते की, फोनवर बोलता बोलता फोन कट होणे इतकाच भाग केवळ कॉलड्रॉप मानला जाणार नाही तर फोनवर बोलत असताना आवाज ऐकू न येणे, अडकत अडकत आवाज येणे वा नेटवर्क कमकुवत होणे ही स्थितीही कॉलड्रॉप म्हणून स्वीकारली जाणार आहे. अनेक कंपन्यांनी अनेकदा नेटवर्कचा मुद्दा दाखवून कॉलड्रॉप असला तरी तो नाकारला आहे. मात्र, आता तसे होणार नाही. फोनवर बोलताना येणाऱ्या अशा प्रकारच्या कोणत्याही अडचणी या कॉलड्रॉप वर्गवारीत गणल्या जाणार आहेत. २०१० नंतर प्रथमच असा बदल केला गेला असून इतकेच नव्हे तर कॉलड्रॉपबाबत लक्ष ठेवण्यासाठी ट्राय स्वतंत्र प्रणालीही तयार करत आहे. वापरकर्तेही या संबंधात तक्रारी करू शकणार आहेत. प्रत्येक मोबाईल टॉवरच्या नेटवर्कबाबत प्रत्येक दिवसाच्या स्व्हिहसची तपासणी होणार असून दोन टक्क्यांपेक्षा अधिक कॉलड्रॉप झाल्यास दंड लागू होणार आहे. याचप्रमाणे डेटा ड्रॉपवरही नियंत्रण लावण्यासाठी ट्रायने तयारी सुरू केली आहे.
Tags

Top Post Ad

Below Post Ad