काँग्रेस आणि राष्ट्रवादी जागावाटप मतदारसंघनिहाय ताकदीवर अवलंबून


मुंबई - आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी करण्यावर एकमत झाले आहे. मात्र, आघाडी करताना त्यातील जागा निम्म्या-निम्म्या घेण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. हे जागावाटप मतदारसंघनिहाय ताकदीवर अवलंबून राहील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.

आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीपूर्वी चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. या बैठकीला पक्षाचे राज्यातील वरिष्ठ नेते, आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती चव्हाण यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर जागावाटपासंदर्भात कोणतीही चर्चा अद्यापि झाली नसताना काही वावड्या उठत असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले.

ज्या जिल्ह्यांत ज्या पक्षाची ताकद जास्त त्या आधारावर जागावाटपाचा निर्णय होऊ शकतो; पण कोणताही निर्णय झालेला नसताना अशी चर्चा जन्माला घालणे यामागे कुणाची काय मानसिकता आहे, हे स्पष्ट होते, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीला लगावला. आगामी निवडणुकांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यामागे पूर्ण शक्तीनिशी कार्यकर्त्यांनी उभे राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'संख्याबळाच्या आधारावर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरेल' या विधानावर चव्हाण म्हणाले की, लोकसभेच्या आघाडीबाबतचा पूर्ण निर्णय अखिल भारतीय काँग्रेस समिती घेते. तसेच देश पातळीवर काय धोरण ठेवायचे याचा अधिकारही त्या कमिटीला असल्याने यावर अधिक बोलता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.