
मुंबई - विलेपार्ले पश्चिम येथील डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात इगल या खासगी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे. येथील सुरक्षा रक्षक प्रत्येकालाच दादागिरी करत असून रुग्णाच्या नातेवाईकांनाही डीन, डॉक्टर, वैद्यकीय अधीक्षकांना भेटू देत नाही असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.
गोरगरीब समाजातील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे रुग्णालय म्हणून कूपर रुग्णालयाची ओळख आहे. या ठिकाणी वैद्यकीय कॉलेज, शिकाऊ डॉक्टर, परिचारिकांसाठी वसतीगृह, सुपरस्पेशालिस्ट साधनसामुग्री व विविध अत्याधुनिक कक्ष आहेत. दररोज सकाळी ओपीडीला जोगेश्वरी, विलेपार्ले, अंधेरी, वर्सोवा, डी. एन. नगर, यारी रोड, ओशिवरा, सांताक्रुझ आदी विविध ठिकाणांहून गरीब रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात येत असतात. मात्र, येथील खासगी सुरक्षा रक्षकांकडून रुग्ण व त्यांचा नातवाइकांना आरेरावी, उर्मट भाषा वापरली जाते. त्यांना दमदाटी दिली जाते असे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.
कूपर रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांमध्ये बहुतेक कर्मचारी हे अशिक्षित व रुग्णालयातील कोणत्याही कामाचा त्याला अनुभव नसतो, असे कर्मचारी कमी पगारात ते भरती करत असतात. बरेचदा दक्षिणेकडील व उत्तर भारतीय लोकांची भरती केल्याने त्यांना मराठी भाषेचीही अडचण येते. त्यामुळे रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना तसेच येथील कर्मचाऱ्यालाही या सुरक्षा रक्षकांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रतन अस्वारे यांनी सांगितले.
इगल रक्षकांची नेमणूक करण्याची गरज काय ?
मुंबई महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक तसेच महाराष्ट्र शासनाचे सुरक्षा रक्षक असताना इगल या खासगी रक्षकांची नेमणूक करण्याची काय गरज होती, असा सवाल म्युनिसिपल मजदूर संघाचे प्रकाश जाधव यांनी केला आहे. खासगी सुरक्षा रक्षक हे मस्टरवर ३० कर्मचारी दाखवून प्रत्यक्ष १० कर्मचारीच काम करतात. परंतु पगार मात्र ३० कर्मचाऱ्यांचा काढत आहेत. अशा या बोगस कारभाराविरोधात म्युनिसिपल मजदूर संघाच्या वतीने कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश सुखदेवे यांची भेट घेऊन कारवाईचे निवेदन देणार असून, आमच्या मागणींची प्रशासनाने दखल न घेतल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा प्रकाश जाधव यांनी दिला आहे.