
मुंबई - महाराष्ट्र सरकारने वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, त्या अंतर्गत सायबर गुन्ह्यांची आगाऊ माहिती देणारे अद्ययावत सॉफ्टवेअर लवकरच महाराष्ट्र पोलिसांना मिळणार आहे.
महाराष्ट्र सरकारने सायबर गुन्हेगारीशी दोन हात करण्यासाठी सुमारे ८०० कोटींची ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. त्याचा एक भाग म्हणून एखादा मोठा सायबर गुन्हा घडण्याच्या आधीच पोलिसांना त्याची आगाऊ कल्पना मिळू शकणार आहे. त्यासाठी गुन्हेगारांची माहिती, गुन्हा करण्याच्या पद्धती आणि इंटरनेटच्या माध्यमातून होणारी संदेशांची देवाणघेवाण असा संपूर्ण तपशील संगणकामध्ये फीड करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या संपूर्ण माहितीचे संगणकाच्या माध्यमातून अवघ्या काही सेकंदांत विश्लेषण करून संभाव्य हल्ल्याची कल्पना पोलिसांना आधीच दिली जाणार आहे. पोलीस अधीक्षक बलसिंग राजपूत (सायबर सेल, महाराष्ट्र) यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र सरकारने सन २०१५ पासून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम सुरू केले आहे. ज्याद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून होणारे संदेशवहन, फोटो आदी माहिती संबंधितांनी डिलिट केल्यावरही परत मिळवण्यासाठी (डाटा रिट्रायव्हिंग) आवश्यक असलेले अद्ययावत सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये २४ तासांचे फुटेज अवघ्या काही मिनिटांत तपासणे या नव्या तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहे, असेही राजपूत यांनी सांगितले.