रेल्वे मार्गावर मार्च १९ पर्यंत ७८ सरकते जिने, ३८ लिफ्ट


मुंबई - रेल्वे मार्गावरील प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध योजना राबवत आहे. वृद्ध प्रवासी, महिला, विकलांग प्रवाशांना पादचारी पुलाच्या पायऱ्या चढण्या-उतरण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेता रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे स्थानकांवर सरकते जिने आणि लिफ्ट लावण्यात येत आहेत. मध्य रेल्वे मार्गावर २०१८-१९ या आर्थिक वर्षात तब्बल ७८ सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. त्यात मध्य रेल्वेतर्फे २१, मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे १६, तर सीएसआर फंडातून २५ सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. दादर, ठाणे येथे प्रत्येकी ४, तर परळ स्थानकात ३ सरकते जिने बसवण्यात येणार आहेत.

सरकत्या जिन्यामुळे प्रवाशांना गर्दीच्या वेळेस मोठा दिलासा मिळत आहे. सर्वच रेल्वे स्थानकांवर सरकते जिने बसवण्यात येत आहेत. मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर मार्च २०१७ पर्यंत दादर २, कल्याण २, डोंबिवली २, ठाणे २, मुलुंड, विक्रोळी, भांडुप, विद्याविहार, उल्हासनगर, बदलापूर आणि टिटवाळा येथे प्रत्येकी १ असे १५ सरकते जिने कार्यरत आहेत. तर एमआरव्हीसीतर्फे कर्जत येथे १ सरकता जिना बसवण्यात आला आहे. याशिवाय सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) मधून या आर्थिक वर्षात सीएसएमटी, भायखळा, एलटीटी, चेंबूर येथे प्रत्येक दोन, आसनगाव येथे तीन, तर माटुंगा, करीरोड, नाहूर, शिवडी, आंबिवली, मुलुंड, शहाड, कर्जत, कसारा येथे प्रत्येकी १ असे २१ सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. असे एक एकूण रेल्वे, एमआरव्हीसी आणि सीएसआर फंड असे मिळून तब्बल ५२ सरकते जिने मार्च २०१९ पर्यंत कार्यरत होणार आहेत. २०१८-१९ या आर्थिक वर्षात तब्बल १६ सरकते जिने मध्य रेल्वे बसवणार असून ती स्थानके खालीलप्रमाणे आहेत. दादर-४, ठाणे ४, लोणावळा २, लोकमान्य टिळक टर्मिनस प्लॅटफॉर्म क्र. १-२, एलटीटी प्लॅटफॉर्म क्र.२/३ वर १, घाटकोपर २, एलटीटी प्लॅटफॉर्म क्र. ४/५ वर १ असे १६ सरकते जिने लागणार आहेत. तर मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे या आर्थिक वर्षात कुर्ला ३, ठाकुर्ली १, दादर १, ठाणे २, सीएसटी २, डॉकयार्ड रोड १, मानखुर्द २, वडाळा प्लॅटफॉर्म क्र. १, २, ३ आणि ४ वर प्रत्येकी १ असे तीन सरकते जिने एमआरव्हीसी बसवणार आहे. 

परळ रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील मोकळ्या जागेत दोन, तर प्लॅटफॉर्म क्र. १ वर १ आणि अन्यत्र १ असे चार सरकते जिने परळ स्थानकात लागणार आहेत. तसेच कल्याण येथे २, पनवेल येथे २, दिवा आणि आंबिवली येथे प्रत्येकी एक असे दहा जिने लवकरच कार्यरत होणार आहेत.

प्रवाशांच्या सुविधेसाठी १९ लिफ्ट -
मध्य रेल्वेने सीएसएमटी ५, ठाणे ४, दादर ३, घाटकोपर, डोंबिवली, लोणावळा येथे प्रत्येकी २, तर एलटीटी १ अशा १९ लिफ्ट प्रवाशांच्या सुविधेसाठी लावल्या आहेत. तसेच एमआरव्हीसीने कल्याण ४, वडाळा ३, मानखुर्द, चेंबूर, टिळकनगर, रे रोड येथे प्रत्येकी २, तर चेंबूर, डॉकयार्ड रोड येथे प्रत्येकी १ अशा एकूण १७ लिफ्ट बसवल्या आहेत. २०१८-१९ मध्ये कल्याण आणि परळ येथे प्रत्येकी एक लिफ्ट बसवण्यात येणार आहे. सरकते जिने हे प्रवाशांच्या सोयीसुविधेसाठी २४ तास कार्यरत असतात, तर लिफ्टबाबतीत सीएसएमटी, दादर, एलटीटी आणि कल्याण येथील लिफ्ट दिवसाचे २४ तास कार्यरत असतात.
Tags