
मुंबई - लांब पल्ल्याचा प्रवास करत असताना प्रवाशांच्या खानपान सेवेसाठी ट्रेनमध्ये पॅण्ट्रीकार असते; परंतु अनेक दा या पॅण्ट्रीकारमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यामुळे आता पारंपरिक पॅण्ट्रीकार पद्धतीचा कायापालट करण्यात येणार आहे. पॅण्ट्रीकारमध्ये यापुढे गॅसशेगडीचा वापर पूर्णपणे बंद करण्यात येणार असून त्याऐवजी इंडक्शन किंवा विद्युत शेगडीचा वापर होणार आहे. परिणामी, इंधन बचतीचाही हेतू साध्य होणार आहे.
मुंबईसह काही ठिकाणी राजधानी एक्स्प्रेसमध्ये डब्यांच्या निर्मिती वेळीच त्यापद्धतीने बदल करण्यात आले आहे. अन्य सर्व गाड्यांमध्ये भविष्यात टप्प्याटप्प्याने गॅसशेगडीचा वापर बंद करण्यात येणार आहे. मुंबई, कोकण, गुजरात, राजस्थान आदी पश्चिम विभागात याप्रकारे १४६ गाड्या आहेत. देशभरात याप्रकारे पॅण्ट्रीकारची संख्या ३०० पेक्षाही जास्त आहे. त्यात आमूलाग्र बदल करताना पॅण्ट्रीकारमधील किचन प्लॅटफॉर्म, शेगड्या, भांडी आदी सर्वच बदल होणार आहेत. रेल्वेच्या बऱ्याचशा मेल, एक्स्प्रेस्मध्ये पॅण्ट्रीकारची सुविधा आहे. रेल्वेच्या बेस किचनमध्ये तयार केलेले खाद्यपदार्थ पुरवले जातात वा कंत्राटदारांमार्फत खानपान सेवा चालवली जाते. त्यातील पॅण्ट्रीकारची सुविधा असलेल्या गाड्यांमध्ये प्रामुख्याने गॅस शेगडीचा वापर होता; परंतु मेल, एक्स्प्रेसच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने याप्रकारे गॅस शेगडीचा वापर हा योग्य पर्याय नाही. त्यासाठी काही गाड्यांमध्ये कोणतेही अन्न न शिजवता केवळ तयार खाद्यपदार्थ पुरवण्याचीही व्यवस्था केली आहे. त्याव्यतिरिक्त अत्याधुनिक शेगड्यांच्या आधारे अन्न शिजवले जाणार आहे. या पद्धतीमुळे गाड्यांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये काही प्रमाणात बदलही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नव्या पॅण्ट्रीमधील किचन प्लॅटफॉर्मची उंची आताच्या रचनेपेक्षा कमी राहणार आहे. इंडक्शन, विद्युत शेगड्यांमुळे जलद वेळेत अन्न शिजत असून प्लॅटफॉर्मच्या कमी उंचीमुळेही तळाकडे पाणी साचण्याच्या प्रमाणातही घट होणार असल्याचा दावा केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे सुरक्षिततेसोबतच इंधन बचतीचा हेतूही साध्य केला जाणार आहे.