Type Here to Get Search Results !

रेल्वे प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करा

मुंबई - रेल्वे मंत्रालयाने राज्यातील अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली असून त्यासाठीची भूसंपादन प्रक्रिया, नव्याने रेल्वे लाईन टाकण्याची कामे आणि रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांसाठीच्या सोयीसुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृहात राज्यात सुरु असलेल्या विविध रेल्वे प्रकल्पांबाबत आज आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला रेल्वेमंत्री पियुष गोयल उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील अनेक मार्गावर नव्याने रेल्वे लाईन टाकण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. त्यासाठी सिडको,मुंबई विकास प्राधिकरण आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हा प्रश्न निकाली काढावा. सीएसटी- पनवेल, चर्चगेट-विरार कॉरिडॉर मार्ग, विविध स्थानकांतील इलेव्हेटडे कॉरिडॉरची कामे, हायस्पीड रेल्वे, ओव्हर ब्रिजेस, रेल्वे स्टेशनवरील सोयीसुविधा तसेच इन्टीग्रेटेड टिकिटिंग सिस्टिम सुरु करण्यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकांऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

याच आढावा बैठकीत मुंबई रेल्वे विकास महामंडळाने सादर केलेल्या सादरीकरणातून मुंबई शहर व परिसरातील सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. या प्रत्येक प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी घेतली व चालू वर्षासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या सूचना त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीला मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यूपीएस मदान , अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad