रेल्वेने बनवला स्मार्ट डबा

नवी दिल्ली - रेल्वेचा प्रवास सुखद, आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वेने डब्यांना स्मार्ट बनवले आहे. अशा प्रकारचे स्मार्ट डबे रायबरेली येथील रेल्वेच्या मॉडर्न डबा कारखान्यात तयार केले जात आहेत. असा पहिला स्मार्ट डबा मंगळवारी रेल्वेने दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावर प्रदर्शित केला. या वेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी रेल्वेच्या वतीने या स्मार्ट डब्यात पॅसेंजर माहिती आणि डबा कॉम्प्युटिंग युनिट लावण्यात आले आहे. हे युनिट डब्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणार आहे. या स्मार्ट डब्याच्या चाकावर व्हायब्रेशन सेन्सर लावण्यात आले आहे. हा सेन्सर डबा आणि रुळातील अडथळ्यांचा तत्काळ शोध लावेल आणि याची माहिती सेन्सर तत्काळ ॲलर्टद्वारे रेल्वे कंट्रोल रूमला पाठवेल. त्यामुळे गाडीला तत्काळ थांबवून अडचण दूर केली जाऊ शकेल. डब्यातील कोणत्याही दुर्घटनेवर लक्ष ठेवण्यासाठी डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या सेन्सर डब्यातील पाणी संपले असेल, तर याची माहिती पुढील स्टेशनला संदेशाद्वारे पाठवेल. त्यामुळे पुढील स्टेशनवर गाडी थांबवून पाणी भरले जाऊ शकते. तसेच डब्यात प्रवाशांना असुविधा निर्माण झाल्यास किंवा आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास विमानाप्रमाणे तत्काळ डब्यात असलेले बटन दाबून रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्याबद्दल माहिती देता येईल. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारचे शंभर स्मार्ट डबे बनवण्याची योजना आहे. हे सर्व डबे रायबरेलीतील कारखान्यात बनवण्यात येणार आहेत.
Tags