चेंबूरमध्ये अतिक्रमणांवर पालिकेची कारवाई - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

31 August 2018

चेंबूरमध्ये अतिक्रमणांवर पालिकेची कारवाई


मुंबई - चेंबूर परिसरातील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड जवळ राज्य शासनाच्या अखत्यारितील अडीच एकराच्या भूखंडावर उभ्या राहिलेल्या आतापर्यंत ४७० झोपड्या पालिकेने जमीनदोस्त केल्या. उर्वरित २५० झोपड्या हटवण्याची प्रक्रियाही पालिकेने सुरू केली असल्याची माहिती उपायुक्त भारत मराठे यांनी दिली..

नागेवाडी भागातील मॉडर्न शाळेजवळ व रंगप्रभा इमारतीसमोर शासनाच्याच अखत्यारितील पाच एकराच्या भूखंडावर अतिक्रमण करून सुमारे ५५० झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. सुमारे साडेसात एकराच्या दोन भूखंडांवर असलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेद्वारे गेले तीन दिवस धडक कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडजवळील अडीच एकराच्या भूखंडावरील सर्व म्हणजे १७० झोपड्या हटवण्यात आल्या आहेत. तर दुसऱ्या ५ एकरच्या भूखंडावरील ३०० झोपड्या आतापर्यंत हटवण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या सुरक्षेत कारवाई सुरू आहे. चेंबूर परिसरात राज्य शासनाच्या विविध खात्यांच्या व प्राधिकरणांच्या अखत्यारित असणारे २ भूखंड आहेत. सुमारे साडेसात एकर एवढे क्षेत्रफळ असणाऱ्या या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे उद्भवली होती. ही अतिक्रमणे हटवून भूखंड मोकळा करण्याबाबत महापालिकेच्या परिमंडळ - ५ चे उपायुक्त भारत मराठे यांच्या पुढाकाराने त्यांच्या कार्यालयात एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चेंबूर परिसराचे संबंधित उपजिल्हाधिकारी, वन विभागाचे व मिठागर प्राधिकरणाचे संबंधित अधिकारीदेखील उपस्थित होते. या बैठकीत ही अतिक्रमणे हटवण्याबाबत संयुक्त कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार गेले तीन दिवस अतिक्रमण निर्मूलनाची धडक कारवाई करण्यात येत आहे. दोन्ही भूखंडांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी मुंबई पोलीस दलातील १३७ पोलिसांचा ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी राज्य शासनाच्या संबंधित खात्याचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित आहेत, अशी माहिती मराठे यांनी दिली..

Post Top Ad

test