Type Here to Get Search Results !

डिजी लॉकरमधील कागदपत्रे असल्यास कारवाई करू नका - परिवहन आयुक्त

 
मुंबई - वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून किंवा रस्त्यावर वाहन तपासणी करताना वाहनचालकांकडून वाहनाची कागदपत्रे तपासणीसाठी मागितली जातात. अनेक वाहन मालक आणि चालकांकडे डिजी लॉकर ऍप मध्ये वाहनाची कागदपत्रे असली तरी त्याच्यावर कारवाई केली जात होती. याची दाखल घेत आता डिजी लॉकरमधील कागदात्रे असलेल्या वाहन चालकांविरोधात करावी करू नये असे आदेश काढण्यात आले आहे.    

वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना पकडले जाते. आपत्कालीन प्रसंगी, तसेच नाकाबंदी दरम्यान आरटीओ अधिकाऱ्यांकडून वाहनचालकांकडे वाहन अनुज्ञप्ती (लायसन्स), वाहन नोंदणी प्रमाणपत्राची मागणी करण्यात येते. अशा प्रसंगी इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये कागदपत्रे उपलब्ध असल्यास, संबंधित वाहनचालकाकडून पुस्तक रूपातील कागदपत्रांची मागणी न करण्याच्या सूचना ८ आॅगस्ट रोजी केंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिल्या होत्या. या सूचनेनुसार परिवहन आयुक्तलयाकडून १८ आॅगस्ट रोजी डिजी लॉकरसंबंधी आदेश काढण्यात आला आहे.

परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांच्या आदेशानुसार, डिजी लॉकर अ‍ॅपचा वापर करून वाहनचालक अनुज्ञप्ती (लायसन्स), वाहन नोंदणी प्रमाणपत्राची डिजिटल कॉपी मोबाइलमध्ये जतन करू शकतात. वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची मागणी केल्यास डिजी लॉकरमधील कागदपत्रे दाखवू शकतात. संबंधित कार्यालयांनी डिजी लॉकरमधील कागदपत्रे ग्राह्य धरावी, तसेच त्यांच्याविरुद्ध केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८च्या कलम १३०, १७० अन्वये कारवाई करण्यात येऊ नये, असेही आदेशात म्हटले आहे.

नागरिकांमध्ये डिजी लॉकरबाबत जनजागृती करण्याचे आदेश परिवहन आयुक्त चन्ने यांनी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांनी दिले आहेत. ७ सप्टेंबर २०१६ रोजी केंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी डिजी लॉकर मोबाइल अ‍ॅप ही सुविधा नागरिकांसाठी सुरू केली होती.
Tags

Top Post Ad

Below Post Ad