आरटीओला टेस्टिंग ट्रॅक उभारण्यासाठी शिवाजी नगर डेपोतील जागा

Anonymous

मुंबई - परिवहन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या आरटीओ कार्यालयांना टेस्टिंग ट्रॅक उभारण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार परिवहन आयुक्तांनी वडाळा आरटीओला टेस्टिंग ट्रॅक उभारण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडे शिवाजी डेपोतील ७ हजार चौ.मी.ची जागा भाडेतत्त्वावर मागितलेली होती, बेस्ट समितीने २ वर्षांसाठी ही जागा भाडेतत्त्वावर देण्यास मंजुरी दिली आहे. 

वडाळा आरटीओला वाहनांची टेस्टिंग करण्यासाठी स्वतंत्र टेस्टिंग ट्रॅक नाही. त्यामुळे टेस्टिंग ट्रॅक उभारण्यासाठी परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी बेस्ट प्रशासनाकडे पत्राद्वारे शिवाजी नगर डेपोतील ७ हजार चौ.मी. जागा ५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर प्रति महिन्याला २ लाख रुपये भाडे देण्याची तयारी दर्शवलेली होती. परंतु, बेस्ट समितीने ५ लाख रुपये भाडे द्यावे, या मागणीसाठी प्रस्ताव यापूर्वी फेटाळला होता. बेस्टची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. सध्या रेडी रेकनर दर हा ११ लाख रुपयांचा असताना परिवहन विभागाला फक्त २ लाख रुपये प्रति महिना भाडेतत्त्वावर जागा देणे, हे अयोग्य असल्याचे मत बेस्ट समितीचे शिवसेना सदस्य अनिल कोकीळ यांनी मांडले होते. तर ५ वर्षांपेक्षा २ वर्षांचा करार करा आणि दरवेळी १० टक्के भाडेवाढ करण्यास सांगा, असे मत बेस्ट समितीचे भाजपा सदस्य नाना आंबोले यांनी व्यक्त केले होते. त्यानुसार बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्र कुमार बागडे यांनी परिवहन आयुक्तांशी चर्चा करून भाडे ५ लाख करण्यास सांगितले. परंतु, भाडे वाढविताना ५ वर्षांवरून २ वर्षेच जागा भाडेतत्त्वावर घेण्याची परिवहन विभागाने मागणी केली. त्यानुसार आता २ वर्षांसाठी ही जागा परिवहन विभागाला ५ लाख रुपये महिना भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. या ७ हजार चौ.मी. जागेत २ हजार चौ.मी. जागेवर टेस्टिंग ट्रॅक उभारण्यात येणार आहे, तर उरलेल्या ५ हजार चौ.मी. जागेत प्रसाधन गृह, वाहन चालकांसाठी कक्ष बांधण्यात येणार आहेत. बेस्टच्या ताब्यातील ही जागा सध्या मोकळी आहे. या जागेसाठी ५ लाख रुपये दर महिन्याला भाडे देण्यात यावे, अशी मागणी बेस्ट समिती सदस्यांनी केली होती. ती मागणी परिवहन विभागाने मान्य केल्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
Tags